भोर : महान्यूज लाईव्ह
सोनाग्राफी सेंटरचा अनियमितता अहवाल न देण्याबाबत भोर शहरातील डॉक्टरकडून लाच स्विकारण्याबाबत भोरच्या उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित हिंदुराव सरदेसाई यांच्यावर आज लाललूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे भोरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरची तपासणी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक करत असतात. या सोनोग्राफी सेंटरबाबतचा अहवाल त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना पाठवायचा असतो. पण तक्रारदारांच्या सोनाग्राफी सेंटरमध्ये असलेल्या अनियमिततेचा अहवाल न पाठविण्यासाठी डॉ. अमित सरदेसाई यांनी तक्रारदारांकडे रुपये दहा हजाराच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम तडतोडीनंतर रुपये पाच हजार ठरली.
या गोष्टीची तक्रार संबंधीत डॉक्टरांनी लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. त्यानंतर तक्रारदाराने दिलेली पाच हजार रुपयांची रक्कम वैद्यकीय अधीक्षकांनी स्विकारल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लाचलूचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरु केली आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.