माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
स्त्रीचे सौंदर्य प्रत्येकाला आवडते मात्र तिचे स्वातंत्र्य कोणालाही आवडत नाही, ही मोठी शोकांतिका असून ग्रामीण भागातील स्त्रियांवरील अत्याचार हा घरातील नातेवाईक आणि ओळखीच्याकडून झाल्याचे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. यासाठी मुलींनी आपल्या पालकांशी सुसंवाद साधून आलेल्या संकटाला निडरपणे सामोरे जाण्याचे धाडसी आवाहन राजगड पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकप्रमुख प्रमिला निकम यांनी केले.
शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर ( ता. भोर ) येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी निकम बोलत होत्या. यावेळी प्रा. डॉ. जगदीश शेवते, प्रा. पोर्णिमा कारळे, प्रा. रफतनाज डांगे, प्रा. कोमल पोमण, प्रा. प्राजक्ता कापरे, प्रा. सहदेव रोडे, प्रा. संदीप लांडगे, प्रा. दयानंद जाधवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. तुषार शितोळे म्हणाले ‘ पुरुष महिलांना पर्याय ठरू शकत नाही. परंतु स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक आहेत. ‘ उज्वल भवितव्यासाठी स्त्री पुरुष समानता असणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यात महाराष्ट्र देशात अव्वल आहे, हे प्रमाण कमी करायचे असेल तर महाविद्यालयीन तरुणांनी समाज माध्यमांचा वापर भान ठेवून करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जिल्हा क्रीडा विभागीय समितीच्या अॅथलेटिक्स संघात निवड झालेल्या विद्यार्थिनी संध्या कोंडे, सानिका झेंडे, धनश्री शिंदे तसेच राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी झालेल्या ऋतुजा वाल्हेकर, अनुजा वाल्हेकर, गौरी यादव तसेच अॅथलेटिक्स निवड झालेल्या शीतल वाईकर तसेच फुटबॉल संघात निवड झालेल्या श्रुतिका पांगारे, आकांक्षा लांडे, अंकिता कुंभार तसेच कुस्ती संघात निवड झालेल्या श्रद्धा सोंडकर व अक्षता सणस या महाविद्यालयातील गुणवंत खेळाडू विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आले.
निकम यांच्या व्याख्यानाने तरुणींमध्ये मनोबल वाढले..
कार्यक्रमात निर्भया पथकप्रमुख पोलीस हवालदार प्रमिला निकम यांनी छेडछाड करणाऱ्या मुलांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. तसेच त्यांनी केलेल्या आत्मनिर्भर व्याख्यानाने यावेळी विद्यार्थिनींमध्ये निर्माण झालेले मनोबल आणि चैतन्याची झलक मुलींच्या चेहऱ्यावर झळकत होती.