दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड ते पाटस मार्गावर पाटस येथील अंबिकानगर परिसरात येथे एका अज्ञात व्यक्तीने गाडी थांबवली. पोलीस असल्याचे सांगत तपासणी करायची आहे असे सांगत रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा ५० हजार आठशे रुपये लुटुन फरार झाल्याची घटना घडली आहे. ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
सोमवार ( दि.७ ) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पाटस दौंड अष्टविनायक मार्गावर पाटस येथील अंबिकानगर येथे घडली. याबाबत बबन रामभाऊ शेलार (वय ६९ रा. देलवडी, ता. दौंड ) यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस असल्याचे सांगणाऱ्या या व्यक्तीने अंगात लाल रंगाचा शर्ट, काळे रंगाची पॅंन्ट, पायात पोलीस घालतात तसा काळे बुट, उंची अंदाजे सहा फुट, जाडसर केस मागे वळविलेले व पोलीस साईड कट मारलेला, तोंडावर काळे रंगाचा मास्क घातले होते.
तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.
दरम्यान वरील वर्णनाचा व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्वरीत यवत व पाटस पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. तीन दिवसांपूर्वी दौंड शहरात सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यास पोलीस असल्याचे सांगत मौल्यवान वस्तू घेऊन लुटल्याची घटना घडली होती.अवघ्या तीनच दिवसांत अशीच घटना दिवसाढवळ्या व भरदुपारी पाटस – दौंड रस्त्यावर घडली आहे.
या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दौंड तालुक्यात हे डमी पोलीस कोण आहेत, यांचा शोध घेऊन त्यांना जेलची हवा दाखविणे हे दौंड व यवत पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.