राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
रशिया व युक्रेन युध्दामुळे युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या दौंड तालुक्यातील विद्यार्थी सोमवारी सुखरूप घरी पोहोचले. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या मदतीमुळेच आम्ही सुखरुप आमच्या घरी परत आलो, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तिथे आलेल्या अनुभव आणि घरी पोहचेपर्यंत झालेल्या प्रवासाचे वर्णन त्यांच्या तोंडुन ऐकताना अंगावर शहारे आले. दरम्यान चार विद्यार्थ्यांचे केडगाव येथे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी दौंड तालुक्यातील सात विद्यार्थी युक्रेन येथे गेले होते. मात्र रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून ते युक्रेनमध्ये अडकले होते. यामुळे या विद्यार्थांचे पालक चिंतेत होते. आपली मुले घरी कधी येणार याची चिंता त्यांना सतावत होती. टिव्ही आणि मोबाईलवरुन या युध्दाच्या बातमीचा ते सातत्याने आढावा घेत होते. आपल्या मुलांशी ते मोबाईल करुन विचारपूस करीत होते. या विद्यार्थ्यांना भारतात आणि त्यांच्या घरी सुखरूप आणावे अशी विनंती या पालकांनी केली होती.
तेजस दिनेश मोहीते (रा.केडगाव ), दिग्वजय दशरथ माळी, ऋत्विक रमेश शिर्के,रुतुजा रमेश शिर्के, प्रतिक रमेश शिर्के (हे रा.दौंड शहर ), आविष्कार अरुण मुळे (रा.केडगाव ), पीयुष विकास थोरात ( रा.पिंपळगाव ) हे सात विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले होते. यापैकी आविष्कार मुळे व ऋतुजा शिर्के हे दोघे लवकर घरी पोहचले होते. बाकीचे पाच जण सोमवारी घरी पोहचले.तब्बल दहा दिवस त्यांचा युक्रेन ते दौंड असा प्रवास झाला. युक्रेन ते दिल्ली पर्यंत प्रवास खर्च केंद्र सरकारने केला तर दिल्ली ते पुणे हा खर्च राज्य सरकारने केला. केंद्र आणि राज्य सरकारने मदत केल्यानेच आम्ही सुखरुप घरी पोहचलो अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली.
जसे युक्रेन व रशिया यांच्यात युद्ध सुरू झाले तेव्हा पासून या विद्यार्थ्यांचे हाल सुरू झाले.त्यांना जेवण व पाणी मिळाले नाही. जीव धोक्यात घालून अन्न व पाण्यासाठी बाहेर पडावे लागत होते. युक्रेन सरकारने या विद्यार्थ्यांना ठेवले, त्याठिकाणी कधी बॉम्ब हल्ला, गोळीबार किंवा काय होईल हे सांगता येत नव्हते. पाचशे ते सहाशे किलोमीटरवर सीमा होती तेथपर्यंतचा प्रवास रेल्वेने केला. तीन दिवस जीव मुठीत धरून प्रवास केला. दिल्लीत आलो तेव्हा कुठे तरी जीवात जीव आला आणि सुटकेचा निःश्वास टाकला. तरी पण घरी कधी जातोय याची ओढ होती, असा थरारक अनुभव त्यांनी यावेळी सांगितला..
यावेळी या विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.