नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिकमधील एका उद्योजकाच्या घरी योजनाबद्ध रितीने टाकलेल्या दरोड्यात दीड वर्षाच्या बाळाच्या मानेला सुरा लावून सोने आणि रोख रक्कम हस्तगत केली. यानंतर घरातील लोकांसमोर डान्स करून आणि देवाला नमस्कार करून दरोडेखोरांनी पळ काढल्याची घटना घडली आहे.
बाबुशेठ नागरगोजे या उद्योजकांच्या घरी हा प्रकार घडला आहे. नाशिक जिल्ह्यातील सातपूर येथील लाहोटीनगरात ही घटना घडली आहे. चोरट्यांनी यापुर्वी या घराची रेकी केल्याचेही समोर आले आहे.
नागरगोजे कंपनीत जाण्यासाठी घराबाहेर पडल्यावर अर्ध्या तासातच दरोडेखोर घरात हजर झाले. त्यांनी महिलांना धमकावले, त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या. दीड वर्षाच्या बाळाच्या नरड्यावर सुरा ठेवून घरातील ऐवज कुठे ठेवलाय याची माहिती घरातील लोकांकडून घेतली. त्यानंतर घरातील सगळ्यांना देवघरात डांबले. ५० तोळे सोने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम हाती लागल्यावर दरोडेखोर आनंदाने नाचले. घरातून जाताना घरातील देवाला नमस्कार करून आणि तुमचा आणि आमचा देव एकच आहेच आहे की असे म्हणून दरोडेखोर बाहेर पडल्याचे घरातील लोकांनी सांगितले.
घरातील कुत्र्याला दरोडेखोरांनी काहीतरी खायला घातले असल्याचीही शंका पोलीसांना आहे.