पुणे : महान्यूज लाईव्ह
केवळ उसने घेतलेले ५ हजार द्यायचे राहिले, म्हणून एकाचे अपहरण केले गेल्याचा प्रकार हडपसर येथे उघड झाला आहे. पोलिसांनी अवघ्या चार तासात गुन्हेगारांना अटक केली आहे.
रविवारी ( ६ मार्च ) सकाळी अकरा वाजता हडपसर परिसरात एक पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीत एका व्यक्तीला जबरदस्तीने बसवून गाडी निघून गेली होती. पोलिसांना ही माहिती कळताच मोबाईल कॉल आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीच्या आधारे पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना ही गाडी नाना पेठ येथे सापडली. या गाडीला पोलिस पथकाने घेराव घालून गाडीतील सहाजणांना ताब्यात घेतले. यामध्ये पाचजण आरोपी तर एकजण अपहरण झालेला व्यक्ती होता.
दिपक मोहन ताकतोडे, छगन विठ्ठल जगदाळे, भगवान दत्तु शिंदे, विशाल नानासाहेब सावंत, विजय सिद्धेश्वर शितोळे या पाचजणांच्या या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे पाचही जण अरण, ता. माढा येथील राहणारे आहेत. या पाचजणातील भगवान दत्तू शिंदे हा खुनाच्या गु्न्ह्यात २०१० पासून जेलमध्ये होता, तो सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पॅरोल रजेवर जेलमधूर बाहेर आहे.
अपहरण झालेली व्यक्ती ही माढा तालुक्यातील दत्तनगर, मोडनिंब येथील रहिवासी असून त्याने छगन जगदाळे याच्याकडून २० हजार रुपये हातउसने घेतले होते. त्यापैकी १५ हजार त्याने परत दिले आहेत. उरलेल्या ५ हजारापोटी जगदाळे त्याच्याकडून १ लाख रुपये मागत होता. एवढे पैसे देण्यास सदर व्यक्तीने नकार दिल्याने हे अपहरण करण्यात आले. पैसे दिले नाही तर खलास करुन कोठेतरी फेकून देईन अशी धमकी गाडीतील टोळके या व्यक्तीाल देत होते.
अवघ्या चार तासात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, अजय गायकवाड, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती गावढे यांनी ही कामगिरी केली.