दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यात महावितरण कंपनीने थकित कृषी बिलांच्या कारणावरून सुरु केलेली वीज तोड मोहीम थांबावावी तसेच विजेच्या संदर्भातील विविध प्रश्नांसंदर्भात दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी सोमवारी देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्य सरकार व महावितरण कंपनीने सुरू केलेल्या वीज तोड मोहीमवर सकारात्मक तोडगा काढावा या मागण्याचे साकड थोरात यांनी पवार यांच्याकडे घातले.
दौंड तालुक्यात महावितरण कंपनीने कृषी पंपाच्या वीज बिलासाठी सरसकट वीज तोड मोहीम राबवली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि महावितरण कंपनीच्या अधिकार्यांमध्ये सातत्याने वादविवाद होऊन संघर्ष वाढत आहे. महावितरणच्या या भूमिकेच्या विरोधात दौंड तालुक्यात शेतकरी आणि भाजप रस्त्यावर उतरत आहेत. महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करीत आहेत. परिणामी सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रह्मदेव आला तरी वीज बिल माफ होणार नाही असं वक्तव्य काही दिवसापूर्वी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच भाजप कार्यकर्त्यांनी वीज तोड मोहीमेवरुन दौंड राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांनी सोमवारी ( दि ७ ) देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथील ‘ मोदीबाग ‘ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी थोरात यांनी तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने उन्हाची तीव्रता देखील अधिक जोमाने वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. वीजेअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांची शेत पिके धोक्यात आली आहेत. अनेक दिवसापासून पिकांना पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांमधून नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे. पिके वाचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याची माहिती यावेळी थोरात यांनी शरद पवार यांना दिली.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव तसेच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या समवेत पुढील दोन दिवसात विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याची माहिती थोरात यांनी दिली.