शिरूर : महान्युज लाइव्ह
डायल ११२ या संकटकाळी उपयोगी पडणाऱ्या सेवेवर विनाकारण फोन करून त्रास दिला तर आता चांगलेच महागात पडणार असून तुम्हाला तुरुंगवारीही होऊ शकते. नागरिकांनी या सेवेचा गैरवापर करू नये असे आवाहन मांडवगण फराटा पोलिस चौकीचे अंमलदार योगेश गुंड यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की,मांडवगण फराटा येथे ग्रामदैवत श्री वाघेश्वर देवाची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रे दरम्यान सर्व पोलिस चौकीचे कर्मचारी बंदोबस्तावर असताना एका तळीरामाने ” डायल ११२ ” या नंबरवर फोन करून माहिती देत मदत करण्याची विनंती केली होती. फोनची त्वरित दखल घेत पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत सदर व्यक्तीला विचारपूस केली मात्र. तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना मिळून आला. फोन करून दिलेली माहितीही देखील खोटी होती. पोलिसांनी सदर तळीरामाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली.
डायल ११२ ही पोलिस दलाने नव्याने सुविधा निर्माण केली असून अडचणीत असलेल्या महिला, मुली तसेच नागरिक यांना त्वरित व जलद मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या सेवेमुळे अनेकांना त्याची योग्य मदतही मिळाली आहे. मात्र विनाकारण फोन करून त्रास देणाऱ्या व्यक्तींमुळे पोलिस दलाची मोठी धावपळ होत असून त्यात वेळेचा अपव्ययही होतो. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा केवळ अडचणीत असताना मदत मिळावी यासाठीच फोन करावा असे आवाहन योगेश गुंड यांनी केले आहे. विनाकारण फोन करून त्रास दिल्यास अशा व्यक्तींवर पोलिस दलाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती गुंड यांनी दिली.