शिरूर : महान्युज लाइव्ह
सहकारी संस्था या टिकल्या तरच सर्वसामान्य सभासदांची प्रगती होते. त्यामुळे आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन सभासदांचे हित लक्षात घेऊन संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती दादा पाटील फराटे, सुधीर फराटे इनामदार यांनी दिली.
मांडवगण फराटा ( ता.शिरूर ) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सहकारी सोसायटी ही गावच्या विकासात महत्वाचा घटक आहे. सहकारात चांगली माणसे आली तर अधिक संस्थेच्या कामात गती मिळत असते. त्यामुळे चांगल्या व कार्यक्षम उमेदवार निवडणुकीत दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीर फराटे इनामदार यांनी बोलताना सांगितले की, गेले दोन वर्षे कोरोनाचे संकट सुरू होते. त्यामुळे आपल्या भागातील अनेक संस्था अडचणीत होत्या. मात्र अशा संकटकाळातही मांडवगण फराटा संस्थेने विकासाची घोडदौड सुरू ठेवली आहे. संस्था नफ्यात आहे. थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने लाभांश वाटप करण्यात आले नाही. यापूर्वीही विरोधक चेअरमन असताना लाभांश वाटप झालेलं नाही. त्यामुळे विरोधक हे दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यक्तिद्वेशातून संस्थेची चौकशी लावण्यात आली, मात्र यात कुठलेही तथ्य आढळून आले नाही. संस्थेत सर्व उमेदवार सुशिक्षित असून संस्थेच्या भरभराटीस व वेगळ्या उंचीवर नेण्याचा आगामी काळात प्रयत्न केला जाणार असल्याचे सुधीर फराटे यांनी सांगितले.
यावेळी शिवशक्ती पॅनलचे गोविंद फराटे,संतोष फराटे, ज्ञानेश्वर वसंतराव फराटे, कैलास फराटे, आत्माराम फराटे, रावसाहेब जगताप,अमोल जगताप, शरद गायकवाड, मीनाक्षी फराटे, रुपाली दत्तात्रय फराटे, हनुमंत राजगुरू, रामचंद्र सुतार, बाळासो कोळपे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.