राजेंद्र झेंडे
महान्युज लाईव्ह : संपादकीय
शेतमालास बाजार दर नाही, बॅंका, खासगी सावकारी यांच्याकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना सातत्याने या फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आणि कृषी प्रधान देशात घडत आहेत. वेगवेगळ्या कारणांवरून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. काल परवाचीच घटना, पंढपुर येथील शेतकरी सुरज जाधव यांनी महावितरण कंपनीने सुरू केलेल्या वीज तोडीमुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना अख्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिली. यासारखे दुर्देव नाही. जगाचा पोशांदा असलेला शेतकरी हा फक्त बोलायला आणि नावापुरताच राहीला आहे. बळीराजाला आत्महत्येस कारणीभुत असलेले हे वामन रूपी सरकार आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट बघणार असे प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात महावितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून कृषी पंपाच्या थकित वीज बीलाच्या संदर्भात तोड मोहीम राबवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून शेत पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने महावितरण विरोधात मागील काही दिवसांपासून शेतकरी आणि विरोधक आंदोलन करताना दिसत आहे. पुणे जिल्हयात दौंड, इंदापुर आणि बारामती तालुक्यात शेतकरी आक्रमक होताना दिसले. मात्र तरीही महावितरण कंपनीकडून वीज तोड मोहीम सुरूच आहे. त्यामुळे महावितरण कंपनी आणि शेतकरी यांच्यात संघर्ष वाढताना दिसत आहे. मागील बारा वर्षापासूनची वीज बिलाची थकबाकी महावितरण कंपनी आता वसुल करीत आहे. नैसर्गिक संकटाला सामोरे जात शेतकरी शेतात आपली पिके घेत आहेत. त्यातच पाणी आहे तर वीज नाही आणि वीज आहे तर पाणी नाही असी परिस्थिती आहे. शेतपिके घेतली तर शेतपिकांनी योग्य बाजार दर नाही. शेतमालांचे बाजार दर स्थिर नाही. परिणामी आर्थिक संकटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने सक्तीची वीज बील वसुली करीत सरसकट वीज तोड मोहीम राबवली आहे. हा अन्याय असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
त्यातच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रम्हदेव आला तरी वीज बील माफ होणार नसल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना वीज बील भरल्याशिवाय पर्याय उरला नाही. अनेकांनी थोडी थोडी का होईना वीज बिले भरली आहेत. मोठ्या शेतकऱ्यांचे ठिक आहे पण लहान शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत.
त्यातच शेतक-यांवर विविध बॅंका,सोसायटी आणि खासगी सावकरांचे कर्ज आहेच ते फेडता फेडता उभे आयुष्य गेले. सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण होत आहे. शेतकऱ्यांच्या सरणावर ही राजकीय मंडळी राजकारण करताना दिसत आहे. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे शेतकरी आणि महावितरण यांच्या संघर्षाचे राजकारण मात्र सुरू आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक राजकारण करण्याची संधी मात्र सोडत नाहीत. यामध्ये बळीचा बकरा नेहमी शेतकरीच होतो. हे असे किती दिवस चालायचे हे कुठे तरी थांबलायला हवे, शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मोफत नको पण चोवीस तास मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. शेतमालास रास्त आणि योग्य बाजार दर द्या, महावितरणचेच काय राज्य सरकारचे ही कर्ज शेतकरी फेडेल एवढी ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र सरकारने कुठे तरी एक पाऊल मागे टाकत विचार करायला हवा.
महावितरण कंपनीच्या विरोधात भाजपने रान पेटवले आहे. त्यांची ही राजकीय नौटंकी आहे की शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा ते दाखवत आहेत. मात्र ते शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांना न्याय फक्त शेतकरी संघटना देऊ शकते. स्वर्गीय शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेने शेतक-यांमध्ये नवी उमेद आणली होती. बांधापासून ते दिल्लीपर्यंत शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला होता. शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली शेतकरी एकत्र आले होते. एक नवी लढाऊ शेतकरी चळवळ महाराष्ट्राने पाहिली. ऊस,कांदा,कापुस तसेच इतर शेतमालाच्या बाजार दरासाठी आणि शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारी शेतकरी संघटना आम्ही पाहिली. सरकारला गुडघे टेकवून आपल्या घामाचे दाम घेणारी शेतकऱ्यांची ताकद आम्ही पाहिली. आजही शेतकरी संघटनेचा बिल्ला खिशाला असलेला शेतकरी आहेत. खिशाला बिल्ला लावून छाती फुगवून आंदोलन करणारे ज्येष्ठ शेतकरी आजही दिसतो.आजही तो रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, याच शेतकरी चळवळीतून खासदार राजु शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रघुनाथ पाटील यांच्या सारखे लढाऊ नेतृत्व तयार झाले. मात्र त्यांना ही राजकीय वास लागला आणि राजकीय प्रवाहात आणि बदलत्या काळात स्वर्गीय शरद जोशी यांनी शेतकरी हितासाठी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेची चार शकले झाली. त्याचे परिणाम शेतकरी आज भोगताना दिसत आहे.
शेतकरी चळवळ आणि कामगार चळवळ पुन्हा नव्या ताकदीने आणि जोमाने उभी राहिली पाहिजे, मतभेद बाजुला सारून शेतकरी हितांसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आजही बांधावरचा शेतकरी म्हणतोय, ती शेतकरी संघटना पुन्हा एकत्र यायला हवी….