माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
नसरापूर – चेलाडी रस्त्यावरील वडाच्या झाडे नष्ट करण्याचे काम विघ्नसंतोषी लोकांकडून इमाने इतबारे केली जात आहे. कुठे पारंब्या तोडल्या जातात तर कुठे झाडांची साल तर कुठे झाडांना आगी लावून निसर्गाची हानी केली जात असून आजही अज्ञातांनी पेटवलेले वडाचे झाड स्थानिक तरुणांनी पाणी मारून विझविले आहे. मात्र अशा घटनाकडे सार्वजनिक विभागाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नाही.
चेलाडीजवळ असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर असलेल्या वडाच्या झाडाला अज्ञातांनी आग लावली. आगीत झाड पूर्णतः भस्मसात होण्याच्या मार्गावर असतानाच घटनास्थळी उपसरपंच गणेश दळवी, सचिन परदेशी, मनोज वाल्हेकर आदी तरुणांनी धाव घेऊन पाणी मारून
झाड विझविण्याचा प्रयत्न केला. झाड विझविले जरी असले तरी भस्मसात झालेला झाडाचा काही भाग केव्हाही कोसळू शकतो. यामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
चार ते पाच वर्षापासून नसरापूर चेलाडी या मुख्य रस्त्यावरील कचरा पेटवण्याचा नवाखाली वडाची झाडांची हानी केली जात आहे. या काळात स्वार्थी व्यवसायपायी काहींनी बहरलेल्या वडाच्या झाडांच्या पारंब्या तोडून हळूहळू झाडच नष्ट केली गेली आहेत. झाडांचा बळी देण्यासाठी झाडांची साल काढण्यात येते. साल काढल्यामुळे खोडावर कीटक हल्ला करतात. यामुळे काही दिवसात झाडांचा अंत होत असतो.
एकीकडे शासनाच्या वतीने प्रतिवर्षी कोट्यावधी झाडांचे रोपण केले जात आहे. मात्र काही महाभाग हे झाडांचा बळी देण्यासाठी बुंध्याशी अथवा झाडाच्या मध्यभागी खळ झालेल्या ठिकाणी ऍसिड टाकून पेटता दिवा लावून झाडे जाळली गेली असल्याची चर्चा झडत आहे. मात्र स्वतःच्या मालकीची झाडे असूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पूर्णतः कानाडोळा करत असतात. यामुळे दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे.
‘झाडांची कत्तल अथवा झाड कोणी पेटवत असेल तर त्याबाबत सार्वजनिक विभागाने अथवा सजग नागरिकांनी तक्रार दिल्यास चोकशी करून कारवाई करू’ – एस. यु. जाधवर, वनपाल, नसरापूर विभाग
हे माहीत आहे का? —— वडाचे झाड किमान 1000 वर्षं जगते. त्यापासून आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने असंख्य फायदे मिळतात. ऐतिहासिक वारसा असलेल्या या झाडाला तोडल्यानंतर पुन्हा असे झाड येण्यासाठी 400 वर्ष वाट पहावी लागते. याचा विघ्नसंतोषी लोकांनी बोध घेण्याची गरज आहे.