शिवाजी हरीदास लाळगे
बोरी ता.इंदापूर जि.पुणे
पूर्वीच्या काळी होळीच्या सणाची महिनाभर अगोदरच लगबग चालायची. दुकानात टमक्या विकायला आल्या की समजायचे होळीचा सण जवळ आलाय.
होळी पौर्णिमा ( शिमगा ) हा सण आमच्या बालपणातील आमच्या कलाआविष्काराला वाव देणारा सण होता. त्या काळी होळीच्या दिवशी होळी करून होळीच्या कडेने बोंबलत होळीला वेढा मारायला लागे. खरोखरच किती मज्जा येत होती. लहान लहान मुले देहभान विसरून अगदी आनंदाने बोंबलायची. टमक्या वाजवून नाचत नाचत होळीचा सण साजरा केला जायचा. टमकी म्हणजे लोखंडाच्या गोलाकार कड्याभोवती चामडे विणलेले वादय, खरं तर ही टमकी म्हणजे वादयकलेला प्रोत्साहन देणारे छोटेसे वाद्यच. पूर्वी किराणा दुकानात या टमक्या विकायला यायच्या. होळी सणाच्या एक महिना अगोदर दुकानदार टमक्या विकायला आणायचे, म्हणजेच दुकानात टमकी विकायला आली की समजायचे, शिमगा सण जवळ आला आहे. मग आम्ही टमकी घेवून दोन चांगल्या लाकडाच्या काटक्या घेवून टमकी वाजवत बसायचो. टमकीला सुतळीचा तुकडा बांधून टमकी गळ्यात घालून वाजवायचा आनंद मोठा औरच असायचा.
चामड्याच्या टमक्या सर्वच जण विकत घेऊ शकत नव्हते. बहुधा बरेच जण त्याकाळी गरिबीशी सामना करीत होते. चामड्याच्या टमक्या आकर्षक असायच्या. टमकीच्या कडेने बाहेरील बाजूने गोलाकार रंग दिलेला असायचा. मध्यभागी वेगवेगळी चित्रपटांची नावे लिहीलेली असायची. उदाहरणार्थ- गंमतजम्मत, सर्जा, दिल, डॉन. त्यामुळे टमकीची आकर्षकता वाढायची व किंमतही तशीच असायची.
परंतु प्रत्येक मूल हे सर्जनशील असते, जे टमकी, विकत घेवू शकत नव्हते ते स्वतः हाताने टमकी बनवत होते. जुन्या खराब झालेल्या चाळणीचे कडे, लोखंडाचे कडे, रद्दी पेपरचा जाड कागद, किंवा पुस्तकांना कव्हर घालायचा खाकी कागद वापरून टमकी तयार केली जायची. चाळणीच्या गोलाकार कड्यावर पाजणाने ( चिंचोक्यापासून तयार केलेली खळ ) खाकी कागद चिटकायचा . नंतर ती खाकी कागद चिटकवलेली टमकी उन्हात वाळत ठेवायची. कागद वाऱ्याने फाटू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जायची. खरेच ती बनवलेली टमकी आम्हाला खूपच आनंद द्यायची.आमच्यातील कलागुण जागे व्हायचे. टमकी वाजवून वाजवून फुटायची. म्हणजे खाकी कागद फाटायचा , मग तेवढाच खाकी कागद दहा पैशाला मिळायचा. स्वस्त आणि मस्त टमकी बरेच काही शिकवून गेली. त्यावेळी पैशाने माणसं गरीब होती पण सुखाने श्रीमंत होती.