इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पंढरपूर मधील युवकाने विज बिल वसुलीच्या विरोधात केलेल्या आत्महत्येनंतर सोलापुरातील भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे भरणेवाडी येथे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले.
सोलापूर भाजपच्या वतीने यासंदर्भात कालच इशारा दिला होता. पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या युवकाने वीज बिल वसुलीच्या विरोधात आत्महत्या केल्यानंतर आज भरणे यांच्या निवासस्थानासमोर आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जाहीर केले होते.
राज्यात वीज बिल वसुली विरोधात शेतकरी संतप्त आहेत. अशा पार्श्वभूमीवरच पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरेश जाधव या युवकाने फेसबुक लाईव्ह करून व्हिडिओ काढून पुन्हा शेतकऱ्यांच्या जन्माला येणार नाही असे म्हणत विषप्राशन केले. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आज आंदोलनावेळी दत्तात्रय भरणे घरी उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्ही स्वीय सहाय्यकाकडे निवेदन देणार नाही. त्यांच्या कुटुंबातील कोणी जर स्वीकारले नाही, तर आम्ही घरावर निवेदन चिटकवून जाऊ असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.