दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या पथकाने राहु येथे बेकायदा गावठी पिस्तूल व काडतुसे प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पंढरपूर येथून पुन्हा एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व सहा काडतूसे जप्त केली आहे. विकी बाळू गोरे ( रा. भाळवणी. ता.पंढरपूर जि. सोलापूर ) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यवत पोलीसांच्या शोध पथकांनी यास पंढरपूर येथून ताब्यात घेतले आहे.
यवत पोलिसांनी दोन दिवसात बेकायदा सहा गावठी पिस्तुल व 18 कडतुस जप्त करीत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. बेकायदा गावठी पिस्तूल व काडतुसे घेऊन वावरणांची मोठी टोळी पकडण्याची कामगिरी यवत पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ही सर्वात मोठी कामगिरी असून यवत पोलिसांचे विशेषता पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दौंड तालुक्यातील या युवकांकडे गावठी पिस्तूल व काडतुसे आली कुठुन ? त्यांना ही शस्त्र दिली कोणी ? त्यांचे गुन्हेगारी टोळीशी संबंध तर नाही ना ? एवढा शस्त्रसाठा कशासाठी ? या सर्व प्रकाराचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील राहू येथील संतोष जगताप याचा उरळी कांचन येथे गोळीबारातून खून झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली आहे. त्यातच राहू मधील पाच युवकांना बेकायदा गावठी पिस्तूल व काडतुसे बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा दौंड तालुक्यात सध्या चर्चेचा विषय होत आहे.