घनश्याम केळकर
तिखट लवंगी मिरची कोल्हापूरची म्हणून प्रसिद्ध आहे. पण देशात जागोजागी मिरचीच्या अनेक जाती प्रसिद्ध आहेत. मिरची आपल्या जीभेवर, पोटात आणि स्वयंपाकघरात इतकी आता रुळली आहे, की याच मिरचीने ऐकेकाळी भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा झटका दिला होता, हे आपण साफ विसरून गेलो आहोत. मिरचीच्या झटक्याशिवाय भारतीय जेवणाचे ताट अपूरे आहे, पण ही मिरची मूळची भारतीय नाही, हे आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. ५००० वर्षांच्या इतिहास असलेल्या भारतात मिरची अवघ्या ५०० वर्षापूर्वी आलेली आहे. तिने इथे आल्यावर स्वयंपाकघरातून काळ्या मिरीला जवळपास हुसकावून लागले आहे.
मिरचीने काळ्या मिरीला केवळ आपल्या स्वयंपाकघरातून हुसकावले नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापारातून हुसकावले. त्याची फार मोठी झळ जगाच्या व्यापारातील भारताच्या महत्वाला बसली. अशा या तिखट मिरचीची करामत आज आपण बघणार आहोत, आजच्या रविवारच्या लेखात…….
भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास खुप प्राचीन आहे. या व्यापारातील एक मुख्य घटक म्हणजे काळी मिरी. जगभरात जेवणाला तिखटपणा आणणारा एकच पदार्थ होता तो म्हणजे काळी मिरी. याच्याच जोडीला आल्याचाही वापर होई, पण काळी मिरीला पर्याय नव्हता.
ही काळ्या मिरीचे उत्पादन केवळ भारतातील मलबारच्या म्हणजे आजच्या केरळमध्ये होत असे. या काळ्या मिरीशिवाय युरोपातील श्रीमंताना जेवण जात नसे. या काळ्या मिरीसाठी जगभरातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावर येत असत. काळ्या मिरीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेन आणि पोर्तृगाल या त्यावेळच्या महासत्तांमध्ये मोठी युद्धे लढली गेली. केरळमधून अरबस्थानात आणि तेथून युरोपमध्ये हा व्यापार होत असे. पण अरबस्थानात इस्लामचा उदय झाला. त्यानंतर साधारणत: १४ व्या शतकात ऑटोमन साम्राज्याने इस्तंबूलचा ताबा घेतला आणि हा व्यापार बंद पडला. अर्थातच काळी मिरी युरोपला मिळेनाशी झाली.
यानंतर भारताकडे जाण्याचे इतर मार्ग शोधायला युरोपातील राष्ट्रांनी सुरवात केली. यातले दोन जण आपल्याला चांगले माहिती आहेत. एक भारतापर्यंत पोचलेला वास्को दी गामा. आणि दुसरा वाट चुकून अमेरिकेला पोचलेला कोलंबस. वास्को दी गामाने भारतात पोचून काळी मिरीचा व्यापार पुर्ववत करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे कोलंबस भारताऐवजी अमेरिकेला पोचला. तिथे त्याला भारताऐवजी अमेरिका सापडली आणि काळ्या मिरीऐवजी सापडली मिरची.
तर मिरची ही मुळची मेक्सिकन म्हणजे दक्षिण अमेरिकन आहे. कोलंबसने तिचा तिखट गुण पाहून तिला काळ्या मिरीच्या जोडीचे नाव दिले. कोलंबसबरोबर मिरची स्पेन आणि पोर्तुगालमध्ये आली. पोर्तृगालमधून ती भारतात आली. भारतातून आफ्रिकेत पोचली. आफ्रिकेतील गुलामांसोबत ती उत्तर अमेरिकेत पोचली. तिच्या तिखट गुणांमुळे आणि उत्पादन घेण्याच्या सहजतेने तिला जगभर झपाट्याने प्रसिद्धी मिळाली.
आणि अर्थातच काळ्या मिरीला पर्याय निर्माण झाला. काळी मिरी मुळातच महाग होती. त्यामुळे गरिबांच्या घरात तिला प्रवेशच मिळत नव्हता. आता मिरचीने तिथे प्रवेश केला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे काळ्या मिरीवर युरोपचे अवलंबून राहणे कमी झाले. अर्थातच भारताचा आंतराराष्ट्रीय व्यापारातील वाटा घटला. दुसरीकडे याच काळ्या मिरीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वास्को दी गामा भारतात पोचला होता. त्याने काळ्या मिरीचा व्यापार आपल्या नियंत्रणाखाली आणला. पण त्याला तिथे काळ्या मिरीखेरीज अनेक वस्तू व्यापारासाठी मिळाल्या.
हळूहळू काळी मिरी मागे पडली, पण भारताकडे येण्याचे मार्ग युरोपीयन देशांना खुले झाले. त्याचाच परिणाम पुढे भारतावर इंग्रजांचे राज्य येण्यात झाला.
आज मिरची ही भारतातील जवळपास सगळ्या राज्यात पिकविली जाते. भारतातील जवळपास १०० टक्के घरातील स्वयंपाकघरात मिरची पुड असल्याशिवाय स्वयंपाक पुर्ण होत नाही. आज ही मिरचीला परदेशी म्हणण्याची कोणाची टाप नाही. पण याच मिरचीने भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा धक्का दिला हे मात्र याच मिरचीइतके तिखट सत्य आहे.