लक्ष्मण जगताप – बारामती
( शिक्षक आणि लेखक )
विद्यार्थी मित्रहो,
तुमची दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुरू होत आहे .परीक्षा म्हटलं की आपल्याला भीती वाटायला लागते. छातीत धडधड करायला लागतं.कधीकधी हातापायाला घाम फुटतो.ही आपल्या नकारात्मक विचारांची लक्षणे आहेत.मनावरील भीती झुगारुन द्या .
तुमचा अभ्यास चांगला झाला आहे.सराव ही उत्तम झाला आहे ना..मग कसली भीती घेता नि कसली चिंता करता ? आनंदी रहा.परीक्षेच्या काळात सकस आहार घ्या.चांगली झोप घ्या.आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करा.वेळ वाया घालवू नका.वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करा.
अगदी हसत, आनंदाने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.मनावर कोणतेही दडपण घेऊ नका.स्वतः वर विश्वास ठेवा.स्वतःच्या मनाला सतत सांगा मी पेपर व्यवस्थित सोडविणार.
परीक्षेला जाताना आवश्यक ते साहित्य नीट घेऊन जा.प्रत्येक पेपर विचारपूर्वक सोडवा.बोर्डाने दिलेल्या सूचनाकडे लक्ष द्या. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपला पेपर सोडवा.
प्रत्येक प्रश्न आणि त्यासाठी लागणारा वेळ याकडे लक्ष द्या.घाई गडबडीत प्रश्न वाचू नका.प्रत्येक प्रश्न समजून घ्या.मगच सोडवा.सोपे प्रश्न अगोदर सोडवा.म्हणजे आपला आत्मविश्वास वाढेल.
कुठेही खाडाखोड न करता हस्ताक्षर सुंदर काढा.आपला पेपर आकर्षक आणि नीटनेटका कसा होईल याकडे लक्ष द्या.पेपर पूर्ण लिहून होईपर्यंत मन शांत ठेवा.
पेपर झाल्यानंतर त्या पेपरवर चर्चा न करता.पुढील पेपरच्या तयारीला लागा.
स्वतः वरील अखंड विश्वास आणि अभ्यासाची जोड याद्वारे तुम्ही परीक्षेत यशस्वी झालाच म्हणून समजा…