माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय नामदेव वाल्हेकर यांचादेखील गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
पुणे येथील बचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संजय वाल्हेकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, भोरचे सभापती लहुनाना शेलार, जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय वाल्हेकर यांनी कोरोना कार्यकाळात कांबरे सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबु नये यासाठी नेटवर्क नसताना ओसरी शाळा घेऊन वयक्तिक मार्गदर्शन, गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन लांब जाऊ दिले नाही. ३० वर्षाच्या सेवेत त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. शैक्षणिक सेवेबरोबरच सामाजिक जाणिवेमधुन अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. अग्निहोत्र सेवा मंडळाच्या माध्यमातुन नेत्रदान,देहदानासाठी नागरीकांना प्रवृत्त करत असताना स्वतःच्या वडीलांच्या निधनानंतर त्यांचा देह वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासासाठी भारती हाँस्पिटलला दान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. बनेश्वर क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातुन नसरापूर परिसरातील ग्रामीण भागातील मुलांसाठी अॅथेलेटिक्सचे मोफत मार्गदर्शन सुरु करण्यास पुढाकार घेतला. आज अनेक विद्यार्थी राज्य व देश पातळीवर यश मिळवत आहेत. त्यांच्या या सर्व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन तालुका पातळीवरुन या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली होती. त्यावर जिल्हा प्रशासनाने पुरस्कार देऊन मोहर उठवली आहे.
पुरस्कार वितरणानंतर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी संजय वाल्हेकर यांचे अभिनंदन करुन सत्कार केला आहे. या बरोबरच बनेश्वर सेवा मंडळ, बनेश्वर क्रीडा प्रबोधिनी, अग्निहोत्र सेवा मंडळ, भोर तालुका शिक्षक संघटना, नसरापूर प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व विविध संस्थाच्या वतीने वाल्हेकर यांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला आहे.
माणिकराव पवार खूप खूप धन्यवाद