दौंड : महान्युज लाईव्ह
दीड वर्षापूर्वी येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या खुन, मारामारी, लुटमार करणा-या एका अट्टल गुन्हेगाराला दौंड पोलीसांनी दौंड तालुक्यातील माळवाडी येथे शुक्रवारी (ता.०४) मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक त्याला ताब्यात घेतले.अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
अक्षय कोंडक्या चव्हाण (वय २२, रा. माळवाडी, लिंगाळी, ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० मार्च २०२० रोजी मळद (ता. दौंड) येथे एका टोळीने ट्रकचालक काशिनाथ रामभाऊ कदम (वय ५५ , रा. ढोकी, जि. उस्मानाबाद) यांचा खून केल्याची घटना घडली होती. या खून व लुटमारीत आरोपी अक्षय चव्हाण याचा सहभाग होता.
पोलीसांनी आरोपी अक्षय कोंडक्या चव्हाण याला त्याच वेळी अटक करून येरवडा येथील कारागृहात रवानगी केली होती. १६ जुलै २०२० रोजी या टोळीतील अक्षय चव्हाण, देवगण चव्हाण, गणेश चव्हाण व अन्य दोन, असे एकूण पाच कैदी खिडकीचे गज उचकटून कारागृहातून पळून गेले होते. आणि तेव्हापासून अक्ष्या हा फरार होता.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार दौंड पोलीसांच्या स्थानिक शोध पथकाने अक्षय हा माळवाडी येथील पालामध्ये लपून बसला होता. त्यास सापळा रचून अटक केले.
दरम्यान, अक्ष्यला ताब्यात घेताना त्याच्या कुटुंबीयांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीसांपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. दरम्यान, अक्षय चव्हाण याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, खुनासह दरोडा, शासकीय कामात अडथळा आणणे, या प्रकारचे एकूण ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, फौजदार शहाजी गोसावी, सुशील लोंढे आदींच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली.