दौंड : महान्युज लाईव्ह
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील टॉप दहा कार्यक्षम पंचायत समिती सभापती व उपसभापती यादीत दौड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांचा समावेश करण्यात आला असून त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी ( दि. ७ ) पुण्यात होत असलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते दरेकर यांना गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या वतीने या वर्षीपासूनच पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. दौंड पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी उपसभापती सुशांत दरेकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दरेकर हे दौंड तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. पंचायत समिती मधील कामाचा अनुभव ,अपंग व दिव्यांगासाठी मोफत शिबिरे,साहित्य वाटप, विविध प्रशिक्षणातील सहभाग, मतदार संघात केलेले विकासकामे , विविध बैठकांमधील त्यांची उपस्थिती, सभागृह कामकाजातील सहभाग व प्रभाव, त्रिस्तरीय पंचायत संस्थाच्या हितासाठी विभाग/राज्य पातळीवरील केलेले कार्य, मतदार संघात राबविलेल्या नावीन्यपूर्ण योजना विशेष कामगिरी, कामाची वर्तमानपत्रे व प्रसार माध्यमांनी घेतलेली नोंद, या कार्यासाठी आतापर्यंत मिळालेले सन्मान व पुरस्कार, इतर विभागांच्या योजनांची अंमलबजावणी असे निकष या पुरस्कारासाठी ठेवण्यात आले होते. निकषांच्या आधारे दरेकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच राज्यभरातून तीन उपसभापती व दहा जिल्हा परिषद सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुण्यात येरवडा येथे विमानतळ मार्गावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात सोमवारी संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, नगरसेवक परिषदेचे अध्यक्ष राम जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष आशिष गोयल उपस्थित राहणार आहेत.