मुंबई : महान्यूज लाईव्ह
जवळपास ८०० पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी युक्रेनमधील सुमी शहरातून जीवावर उदार होऊन रशियन सीमेकडे वाटचाल करत आहेत.
‘आम्हालाही बाहेर काढा, आम्हाला जर काही झाले तर तुमच्या ऑपरेशन गंगाचा काय उपयोग आहे. ‘ असे हे विद्यार्थी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हणताना दिसतात.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आज दहा दिवस झाले. या हल्ल्याची रशियाच्या सीमेजवळ असलेल्या शहरांना जास्त झळ पोचली. यातलेच एक शहर सुमी. या शहरात जवळपास ८०० भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. या शहरातून रेल्वे जात नाही. विद्यार्थ्यांची सुटका ज्या पोलंड, रोमानियाच्या सीमेवरून सध्या सर्वजण युक्रेन सोडण्याची धावपळ करत आहेत, ती सीमा सुमीपासून १००० कीमीहून जास्त लांब आहे. मधल्या सगळ्या भागात युद्धामुळे अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना बाहेर पडणेच शक्य नव्हते.
हे दहा दिवस या विद्यार्थ्यांनी कसे काढले, त्याचा अंदाज आपल्याला येणेही शक्य नाही. सायरन वाजला की इमारतीखाली असलेल्या बंकरमध्ये जाणे हे पहिले काही दिवस होते. त्यानंतर बंकरमध्येत रहायला जावे लागले. शुन्य डिग्रीखालचे तापमान, ना पुरेसे अन्न , ना पुरेसे पाणी. मागील दोन तीन दिवस तर मिसाईल हल्ले, रस्त्यावरून फिरणारे सैनिक, गोळीबाराने सतत येणारे आवाज यातून हे सगळे विद्यार्थी जात होते.
ऑपरेशन गंगा सुरु झाल्यावर या विद्यार्थ्यांना आपल्यालाही बाहेर काढले जाईल अशी आशा होती. पण ज्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले असा दावा सरकार करते आहे, ते सर्व विद्यार्थी स्वत:च्या प्रयत्नांनी युक्रेनची सीमा पार करून गेले होते. सुमी शहरातील विद्यार्थ्यांना ते शक्यच नसल्याने ते येथून बाहेर पडू शकले नाहीत.
आज रशियाने दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली. यातील एक शहर मरीओपोल हे सुमीपासून ६०० किमी अंतरावर आहे. आज हे विद्यार्थी या सगळ्या बॉम्बवर्षावात, गोळीबारातही या विद्यार्थ्यांनी या शहराकडे जाण्यासाठी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी त्यांनी भारत सरकारला या व्हिडिओ संदेशाव्दारे साकडे घातले आहे.
आता भारत सरकारने याला साद दिली पाहिजे.