महान्यूज लाईव्ह मनोरंजन टीम
महानायक अमिताभ बच्चन आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ‘ सैराट ‘ फेम नागराज मंजुळे या जोडीचा खुप दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला चित्रपट ‘ झुंड ‘ काल प्रदर्शित झाला.
कालच्या एकाच दिवसात या चित्रपटाने दीड कोटी रुपये मिळविले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आमीर खान, दक्षिणेतील सुपरस्टार धनूष यांनी चित्रपट पाहून कौतुकाचे शब्द काढले होतेच, त्यानंतर कालच्या दिवशी चित्रपटाने दमदार सुरुवात केली आहे.
फुलबॉल खेळाच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या क्रिडा प्रशिक्षकाची कथा या सिनेमात सांगण्यात आलेली आहे. टॉपच्या हिंदीतील दिग्दर्शकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
मात्र या चित्रपटावर काही जणांकडून टीकाही होत आहे. लेखिका शेफाली वैद्य यांनी ‘ इतका राग होता उच्चवर्णिय प्रस्थापितांवर, तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला ? ‘ अशा शब्दात त्यांनी झुंडवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर कॉमेंटही पहायला मिळत आहेत.