मु्ंबई : महान्यूज लाईव्ह
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. आता या किंमती ११० डॉलर प्रति बॅरेलच्याही वरती गेल्या आहेत. या वाढत्या किंमतीमुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी डिझेल – पेट्रोलच्या किंमतीमध्ये कमीत कमी १२ रुपयांची वाढ होणे गरजेचे असल्याचा दावा आयसीआयसीआय सिक्योरिटीजने त्यांच्या एका अहवालात केला आहे.
खरे तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही असे सरकार कायम सांगत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या किंमतीतील चढउतारांसोबत देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असल्याचे पहायला मिळते. मात्र कोणत्याही निवडणूका आल्या की अचानकपणे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढायच्या थांबतात असा सगळ्या देशातला अनुभव आहे. याबाबत सरकार स्पष्टपण कधीच काही सांगत नसले तरी राजकीय कारणांमुळे सरकार तेल कंपन्यांना किंमती वाढवून देत नाही हे उघड सत्य आहे.
सध्याही अशीच स्थिती आहे. देशात ३ नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. आता ५ राज्यातील निवडणूका १० मार्चला संपत आहेत. त्यानंतर या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या महागाईच्या झळा मुळातच लागत आहेत. आता पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या तर या महागाईचा वणवा मोठ्या प्रमाणात पेटण्याची शक्यता आहे.
२०१४ मध्ये हे दर कमी होत होत ५० डॉलर प्रतिबॅरलच्याही खाली पोचले होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचे दर ११८ डॉलर प्रतिबॅरेल या सात वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सरकारने निवडणूकीमुळे हे दर दाबून ठेवले असतानाही काही शहरात आजच हे दर १०० रुपयांच्या वर आहेत.
पेट्रोलचे आजचे दर मुंबईत १०९.९८, चेन्नईत १०१.४० तर कोलकत्यात १०४.६७ असे आहेत. इतर ठिकाणीही हे दर ९५ रुपयाच्या आसपास आसपास आहेत. निवडणूका संपल्यावर यात खुप मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.