राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे संकेत पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिले आहेत.
दरम्यान ही चौकशी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि दौंड भाजपाचे आमदार राहुल कुल यांना धक्का मानला जात आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे सभासद नामदेव ताकवणे यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरु असलेली जप्तीची कारवाई थांबवणे व संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभाराची आणि भष्ट्राचाराची चौकशी हवी त्यासंदर्भात पुणे प्रादेशिक सहसंचालक साखर तसेच महाराष्ट्र साखर आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी घेतली असून चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश आज ( ४ मार्च ) रोजी पारित केला आहे. तसे पत्र त्यांनी तक्रारदार नामदेव ताकवणे यांच्याकडे दिले आहे. नामदेव ताकवणे यांनी याबाबत तक्रार देऊन लेखी विनंती केली होती. त्या अनुषंगाने भीमा पाटस कारखान्याबाबत आलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज थकल्याचे निमित्त करून जप्तीची कारवाई करण्याचा घाट घातला आहे तो थांबवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी विनंती प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केली होती. मात्र,ही बाब प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या कार्यकक्षेत येत नसल्यानं त्या संदर्भात चौकशी करणे किंवा ते थांबवणं आमच्या कार्यालयाच्या कार्य कक्षेत येत नसल्यास स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली असून सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच आता पुणे जिल्हा प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी भीमा पाटसच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने हा भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान याबाबत भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे सभासद नामदेव ताकवणे म्हणाले की, भीमा पाटस साखर कारखाना हा सध्याच्या विद्यमान संचालक मंडळामुळे बंद पडला आहे. त्यांच्या हलगर्जी आणि बेजबाबदारपणामुळे कारखान्याचे सभासद आणि कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. भीमा पाटस साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही साखर आयुक्त यांच्याकडे केली होती. याबाबत चौकशीचे आदेश दिले असून या भष्ट्र संचालक मंडळावर नक्कीच कारवाई होईल असा विश्वास नामदेव ताकवणे यांनी व्यक्त केला.