शिरूर : महान्युज लाइव्ह
कोरोना काळानंतर शासनाने थिएटर कलांवंताकडे लक्ष दिलं आहे मात्र तमाशा कला ही सुद्धा अडचणीत असून याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी तमाशा कलावंतांच्या व्यथा जाणून घ्याव्यात अशी मागणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे, नितीन बनसोडे करवडीकर यांनी केली आहे.
मांडवगण फराटा ( ता.शिरूर ) येथे आल्यानंतर मंगला बनसोडे, नितीन बनसोडे करवडीकर यांनी संकेतस्थळ ” महान्युज लाइव्ह ” शी संवाद साधला.यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी बोलताना मंगला बनसोडे यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे हा काळ प्रत्येकासाठी खडतर होता.या मधल्या काळात अनेकांचे संसार कोलमडले. त्याचबरोबर गेले दोन वर्षे शासनाने निर्बंध लादले होते. त्यामुळे सर्वात मोठे नुकसान तमाशाचे झाले. या काळात आम्ही प्रत्येकाचे कुटुंब समजून विविध मदत देण्याचा प्रयत्न केला. व्यथा मांडण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. दूरचित्रवाणीवर मुलाखत दिल्यानंतर अनेकांनी मदत देऊ केली. त्यामुळे काहींना आधार देता आला. सध्या शासनाने काहीसे निर्बंध शिथिल केली असले तरी अनेक जिल्ह्यात मात्र तमाशास परवानगी दिली जात नाही. महाराष्ट्रभर फिरत असताना गेल्या महिनाभरात दिवसरात्र मेहनत घेत केवळ ३० खेळ करता आले आहेत. थिएटरला कला सादर करणे, भाडे व अन्य कारणांमुळे परवडत नाही. यात्रा सुरू असल्याने ठिकठिकाणी जसे मिळेल तसे काम सुरू आहे.अनेकदा खेळ करत असताना कमी सुपारी दिली जाते, त्यावरच सगळा खेळ करावा लागतो. मात्र कलाकार, प्रवास भाडे हे अजूनही परवडत नाही. यामुळे शासनाने तमाशा कलावंतांचे प्रश्न समजून घ्यावे. थिएटर इतकेच तमाशा कला जगविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मंगला बनसोडे यांनी केली.
नितीन बनसोडे करवडीकर यांनी बोलताना सांगितले की,सध्या यात्रा हंगाम सुरू झाल्याने पुन्हा तमाशा कलेला सुगीचे दिवस आले आहेत.मात्र होणारा खर्च परवडत नसून तरीही तारेची कसरत करून तमाशा कला आम्ही सादर करतो आहे.शासनाने इकडे लक्ष देऊन गावोगावी स्थानिक पातळीवर विविध परवानग्या मिळाव्या यासाठी प्रयत्न केले तर बऱ्याच अडचणी दूर होतील.तमाशा जरी झाला तरी अनेक तमाशा कलावंतांना महिला कलाकार मिळवणे हे अवघड झाले आहे. उपलब्ध कलाकारांवर शोचे सादरीकरण केले जात आहे. भविष्यात ही कला टिकवायची असेल तर रसिक प्रेक्षक यांनी हुल्लडबाजी न करता खेळास दाद द्यायला हवी.शासनाने जाहीर केलेली मदत द्यावी अशी मागणी नितीन यांनी केली.