सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आतापर्यंत गांजाची झाडे लावल्यावरुन कारवाई झाल्याचे दिसून आले आहे.मात्र तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शेतीच्या भुईमूग व लसूण मध्ये अफूचे आंतरपीक घेवून अफूची शेती करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याकडून झाला आहे. अफूची शेती केल्याप्रकरणी इंदापूर पोलीसांनी तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शेतपिकातून अफूच्या ओल्या बोंडांसह 32 किलो वजनाची झाडे ताब्यात घेतली. पकडण्यात आलेल्या अफूच्या झाडांची ची किंमत खुल्या बाजारात 16 लाखांपेक्षा जास्त आहे..
याप्रकरणी पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे ( दोघे रा. वरकुटे बुद्रुक ता. इंदापूर ) यांच्या विरुद्ध इंदापूर पोलिसांत अंमली औषधीद्रव्य व मनु:प्रभावी पदार्थ अधिनियम कायदा १९८५ चे कलम ८, १५ ,१८, ३२,४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. पकडण्यात आलेल्या बत्तीस पुढच्या झाडांची सरकारी किंमत प्रति किलो साडेसहा हजार रुपये प्रमाणे ११ हजार ३०० रुपये गृहीत धरली असली तरी बाहेरील बाजारपेठेच्या अनुषंगाने या झाडांची किंमत जवळपास ५० हजार रुपये प्रति किलो प्रमाणे जवळपास १६ लाख रुपये होत आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून सहा महिनेही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी सहा ते सात मोठ्या कारवाया करत अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर चांगलीच जरब बसवली आहे. डिझेल चोरी प्रकरण, कत्तलखान्यावरील कारवाई, अवैध गुटख्याची तस्करी, किंवा चोरीच्या फ्रीजचा कंटेनरवरील झालेली कारवाई अशा विविध कारवाईमुळे इंदापूरला एक सक्षम अधिकारी मिळाला असण्याची चर्चा होत असून पोलीस निरीक्षक मुजावर यांचे सर्वसामान्य वर्गातून कौतुक होत आहे.
पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी अफुच्या शेतीवर केलेल्या कारवाई विषयी माहिती देताना सांगितले की, काल वरकुटे बुद्रुक हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व व्यवसायिक हेतुने लावलेली अफु या अंमली औषधीद्रव्य पदार्थाची २,११,३०० रुपये किंमतीची लागवड केलेली झाडे दिनांक२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांना आढळून आली.
या प्रकरणी आरोपी पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे ( दोघे रा.वरकुटे बुद्रूक ता.इंदापूर ) यांच्या विरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आहे.
याबाबत पोलीस हवालदार सुरेंद्र जयवंत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रूक येथील शेतकरी पांडुरंग नामदेव कुंभार यांची जमीन गट नंबर २४ व नवनाथ गणपत शिंदे विहिरीच्या कडेला जमीन गट नंबर २८/२ मध्ये भुईमूग व लसणाच्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अंमली पदार्थाच्या झाडांची थोड्या थोड्या अंतराने बेकायदेशीरपणे लागवड केली होती.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, नागनाथ पाटील, माने साहेब, कॉन्स्टेबल वाघ,नागराळे, कोठावळे,राखुंडे, हवालदार बापू मोहिते, गाढवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.