मुंबई : महान्यूज लाईव्ह
युक्रेन युद्धामुळे उत्तर प्रदेशातील एका राजकारणी तरुणीचे पितळ उघडे पडल्याची अनोखी घटना उघडकीस आली आहे.
युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करीत आहे. हे विद्यार्थीदेखील व्हिडिओ कॉलव्दारे त्यांच्यावर कोसळलेल्या संकटाची आपबिती भारतातील लोकांपर्यंत पोचवत आहेत. परंतू अशाच एका व्हिडिओ कॉलने उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने पितळ उघडे पडले आहे.
ही विद्यार्थिनी व्हिडिओ कॉलव्दारे मदतीचे आवाहन करत होती. परंतू युक्रेनमधून बोलणारी ही तरुणी प्रत्यक्षात हरदोईमधील एका गावाची विद्यमान सरपंच असल्याचे स्पष्ट झाले.
महिलांना राजकारणात संधी देण्यासाठी आरक्षण दिले जाते. परंतू प्रत्यक्षात महिलांच्या नावावर दुसरेच कोणीतरी कारभार करत असते, ही बाब यातून उघड झाली आहे.
वैशाली नावाची ही विद्यार्थिनी केवळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावाला आली होती. तिने निवडणूक जिंकली, त्यानंतर ती शिक्षणासाठी युक्रेनला निघून गेली. ती गावाची सरपंच झाली, पण प्रत्यक्षात सगळा कारभार तिचे वडिल बघत होते.
वैशाली खारकिव्हमधील विद्यापीठात एमबीबीएसचा अभ्यास करत आहे. तिचे वडिल समाजवादी पक्षाचे नेते आहेत.
युक्रेनवर झालेल्या हल्ल्यामुळे एक राजकारणातील एक महिलेची वस्तुस्थिती लोकांसमोर आली . परंतू भारतामध्ये अशा महिलांची संख्या लाखांवर आहे ही वस्तुस्थिती सर्वसामान्य जनता जाणून आहे.