लोणार : महान्यूज लाईव्ह
येथील स्थानिक सीबीएसई शाळा लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलच्या सिद्धेश शिवाजी मुसळे व सुशांत प्रदीप झोरे या विद्यार्थ्यांची इस्रोच्या तीन दिवसीय अभ्यास भेटीसाठी निवड झाली आहे. २० एप्रिल ते ०५ मे दरम्यान सदर मोफत अभ्यासभेट इस्रोच्या चेन्नई किंवा अहमदाबाद शाखेत होणार आहे.
बंसल क्लासेस द्वारा आयोजित विदर्भ बेस्ट ब्रेन काँटेस्ट ही अतिशय स्पर्धात्मक व नामांकित अशी स्पर्धा विदर्भ विभागातील विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांत घेण्यात येते. विदर्भ विभागातील अनेक शाळांतील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात सिद्धेशने आठव्या वर्गातून विदर्भामधून प्रथम तर सुशांतने सातव्या वर्गातून द्वितीय स्थान पटकावले.
संस्थाध्यक्ष शेख मसूद यांनी या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेतर्फे प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी व उपप्राचार्य नबिल शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांच्या पालकांचा सत्कार केला.