शिरुर : महान्युज लाइव्ह
शेतकरी प्रचंड अडचणीत असताना शेतकऱ्यांची वीजबिल थकीत कारणावरून वीजबिल खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नसून सरकारला शेतकरी आगामी निवडणुकीत जागा दाखवणार असल्याचे सांगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी राज्य सरकारवर कठोर टीका करत घणाघात चढविला.
वीजबील प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कृषीपंपाची वीज तोडणी तातडीने थांबविणे याबाबत भारतीय जनता पक्षाचा वतीने शिरुर शहरातील एमएससीईबी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे बोलत होते.
या आंदोलनात माजी आमदार बाबूराव पाचर्णे , तालुकाध्यक्ष प्रदिप सोनवणे यांसह भाजपा पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले की, राज्यातील शासनाला कोणाचा आवाज ऐकू येत नाही. या शासनाने मेट्रोला विरोध केला नंतर त्याला सहमती दर्शविली. अनैतिक मार्गाने हे सरकार आले आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्षानी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये कोणाचे वीज कनेक्शन तोडणार नाही ,थकित बील माफी याबाबत वचननामा दिला होता. शेतकऱ्यांना वीजबील थकबाकीचे हप्ते पाडून शेतकऱ्ंयाना सक्तीने वीजबील भरणा करायला लावले आहे. शेतक-यांची आज वीज बील भरण्याची परिस्थिती नाही. मागील ५ वर्षात एकदाही शेतक-यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले नाही व वीजबील वसुली सक्तीने करण्यात आली नाही, असे पाचर्णे म्हणाले. महाराष्ट्रातील कृषीपंपाची वीजतोडणीची अन्यायकारक असणारी कारवाई तातडीने थांबवावी. कोरोना महामारीने आधीच शेतकरी मरण यातना भोगत आहे. सरकार शेतकऱ्यांना कसलीही मदत करत नाही, व कृषिपंपाची वीज तोडून वाडीवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी सुध्दा बंद केल्याचा आरोप पाचर्णे यांनी केला.
यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी वीजवितरण कंपनीला मागण्याचे निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच विजय भोस,ॲड. सुरेश पलांडे,आदींची भाषणे झाली.