महान्यूज : आजची गझल
जाळल्याने त्यास जळता येत नाही
आणि आकाशास मळता येत नाही
मेनका नाचेल वा नाचेल रंभा
पण तुकारामास चळता येत नाही
जोवरी जाते फिरत नाहीच, तोवर-
एक दाणा त्यात दळता येत नाही
देह आणी मन, मळाचे नाव आहे
फक्त हृदयालाच मळता येत नाही
दंड साधूच्या जरी देहास देशील
साधुच्या आत्म्यास छळता येत नाही
लाभला हा वळण रस्ता छानसा, पण-
मन वळेना म्हणुन वळता येत नाही
ऊन आहे पूर्व पश्चीमेस तोवर
सावलीपासून पळता येत नाही
गझलकार -कमलाकर आत्माराम देसले
झोडगे, ता. मालेगाव, जि. नाशिक
गझलपुष्प समूह, पिंपरी चिंचवड











