महान्यूज लाईव्ह विशेष
खारकिव्ह हे युक्रेनमधील दोन नंबरचे सर्वात मोठे शहर आहे. रशियाच्या सीमेजवळ असलेल्या या शहरात आता ( ३ मार्च ) भयंकर लढाई सुरु झाली आहे. काल याच शहरात झालेल्या बॉम्बहल्यात एक भारतीय विद्यार्थी ठार झाला होता. आज कालच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात मिसाईलचे हल्ले या शहरावर होत आहेत. या शहरात ३५०० पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. यातील काही विद्यार्थी शहर सोडून गेले असले तरी आजही या शहरात मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत.
शहरातील विद्यापीठे, पोलिस मुख्यालय यासारख्या अनेक इमारतींवर सततचे मिसाईल हल्ले सुरु आहेत.
शहरात रशियन सैनिक पोचले असल्याच्याही बातम्या आहेत. परंतू मिसाईल हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रशियन सैन्य शहरात शिरेल आणि शहराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
शहरात असलेले भारतीय विद्यार्थी इमारतीखालील भुमिगत बंकरमध्ये दिवस काढत आहेत. भारतीय दुतावास या विद्यार्थ्यांच्या मदतीला येण्याच्या परिस्थितीत नाही. या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या पोलंड, हंगेरी किंवा रोमानियाच्या सीमेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना जवळपास १००० किलोमीटर अंतर कापावे लागणार आहे.
या शहरात रेल्वेसेवा उपलब्ध असली तरी रेल्वेस्टेशनवर प्रचंड गर्दी आहे. काही विद्यार्थी यापूर्वी रेल्वेने शहर सोडून गेलेलेही आहेत. परंतू आता ज्या पद्धतीने बॉम्बहल्ले सुरु आहेत, त्या परिस्थितीत आपल्या राहत्या ठिकाणावरून बाहेर पडणेही जीवाची जोखीम घेण्यासारखे आहे.
खारकिव्हमधील सगळ्या नागरिकांसोबत भारतीय विद्यार्थीही अतीशय कठीण परिस्थितीत आहेत. भारतीय विद्यार्थी तेथील परदेशी असल्याने त्यांची अवस्था आणखीनच कठीण बनलेली आहे. अन्न आणि पाण्याचा अपूरा पुरवठा, शुन्य अंशाखाली जाणारे तापमान यासारख्या गोष्टींचा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.
सध्या तरी या विद्यार्थ्यांपुढे परिस्थिती निवळण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.