मुंबई : महान्यूज लाईव्ह
तुम्ही विसरला असाल, म्हणून आठवण करून देतो. शाहरुख खानचा पोरगा याला मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात एका क्रुझवर अटक करण्यात आली . त्याच्यावर अंमली पदार्थ जवळ बाळगल्याचा आरोप होता. त्यानंतर काही दिवसात अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला. जवळपास महिनाभर सगळी माध्यमे, मुस्लिमद्वेषी सोशल मिडिया आर्यन खानला आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुख्यात डॉन ठरविण्याच्या मागे लागली होती.
आज केंद्र सरकारच्या एक तपास यंत्रणेने अटकेत टाकलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे त्यावेळचे पहिले व्यक्ती होते, जे आर्यनसाठी उभे राहिले. त्यांनी दररोज पत्रकार परिषदा घेऊन नार्कोटिक्स विभाग आणि त्याचे संचालक समीर वानखेडे यांचे वाभाडे काढले. परिस्थिती हळूहळू आर्यनच्या बाजूला झुकत गेली. यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली.
या देशातील जी नामवंत मुस्लिम व्यक्तिमत्वे आहेत, त्यांना देशाचे शत्रू ठरविण्याचा काही शक्तींचा उद्देश आहे. त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी असे करणे गरजेचे आहे. या शक्तींनीच आर्यन खानभोवती संशयाचे जाळे विणले. आर्यन हा बॉलिऊडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा असल्यानेच या सगळ्या प्रकरणाला मोठी प्रसिद्धी मिळली.
हा सगळी पुर्वपिठीका सांगण्याचे कारण असे की, आज नार्कोटिक्स विभागाच्या चौकशी पथकाने आर्यन खान कोणत्याही आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व्यापार करणाऱ्या टोळीचा भाग असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या चौकशी पथकाने केलेल्या तपासणीचा प्राथमिक अहवाल पुढे आला आहे, त्यानूसार क्रुझवर टाकलेल्या धाडीमध्येही अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत.
या पथकाच्या चौकशीत पुढे आलेल्या बाबीनूसार आर्यन खानने मोबाईलवरुन केलेल्या चॅटवरून त्याचा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व्यापाराशी संबंध असल्याचे स्पष्ट होत नाही. याखेरीज क्रुझवर टाकलेल्या धाडीचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले नव्हते, जो नार्कोटिक्स विभागाच्या कामाचा भाग आहे. या धाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले अंमली पदार्थ एकाच ठिकाणी मिळाल्याचे दाखविण्यात आले हेदेखील चुकीचेच होते.
या पथकाचा हा प्राथमिक अहवाल आहे, याचा संपूर्ण चौकशी अहवाल काही काळाने नार्कोटिक्स विभागाच्या संचालकाना सादर केला जाणार आहे.
या सगळ्यामुळे या क्रुझवरील छापा आणि आर्यन खानला अटक हा सगळाच एका कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होते आहे. ज्या ताकदीने आर्यन खानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला गेला, वेगवेगळ्या माध्यमातून यासाठी अर्धवट आणि चुकीच्या माहितीचा मारा करण्यात आला, आता तेवढ्यात ताकदीने आर्यन खान निर्दोष ठरल्याचे लोकांपर्यंत पोचविले जाईल का, याबाबत शंकाच आहे.
आता आजची ही बातमी कोणत्याही न्युज चॅनेलवर, कोणत्याही पेपरच्या पहिल्या पानावर स्थान मिळवणार नाही. लाखो लोकांच्या मनात येथील मुस्लिमांबाबत या प्रकरणाचे निमित्त करून निर्माण करण्यात आलेली शंका पुरेशी पुसली जाणार नाही.
देशातील काही शक्तींना तेवढेच हवे आहे. त्यामुळेच आता देशातील समजूदार नागरिकांची जबाबदारी वाढलेली आहे.