महान्यूज लाईव्ह विशेष
‘ हिमालयीन बाबा ‘ च्या निर्देशानूसार जवळपास तीन वर्षे भारतातील शेअरबाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज चालत होता, या कथेचा पुढचा भाग आता पुढे आला आहे. हळूहळू या गुढकथेमधील रहस्याचे पडदे उघडले जात आहे, काही काळातच या कथेतील व्हिलनचा चेहरा सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.
या वास्तवातील गुढकथेचा आजचा भाग सांगण्यापूर्वी यापुर्वी काय घडले त्याची थोडक्यात माहिती नव्या वाचकांना देणे गरजेचे आहे.
२०१३ ते २०१६ या तीन वर्षाच्या काळात चित्रा रामकृष्णा या एनएसई अर्थाच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांच्या काळात त्यांनी काही विचित्र निर्णय घेतले. त्यामध्ये एक निर्णय म्हणजे आनंद सुब्रमण्यम नावाच्या व्यक्तीला त्यांनी प्रथम सल्लागार पदावर घेतले, याच आनंदला नंतर प्रमोशन देऊन चीफ ऑपरेटींग ऑफिसर करण्यात आले. अगोदरच्या कंपनीत १४.५० लाख वार्षिक पगार असलेल्या आनंदला चित्राने प्रथम दीड कोटी वार्षिक पगार दिला. ज्यावेळी आनंदने ही नोकरी सोडली, त्यावेळी त्याला जवळपास ५ कोटी वार्षिक पगार होता.
चित्रा या अतीशय संवेदनशील माहिती संस्थेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीला देत होत्या. या माहितीचा फायदा काही विशिष्ठ संस्थांना होत होता. या संस्था या माहितीचा फायदा घेऊन शेअर बाजारात दररोज कोट्यावधी रुपये मिळवत होत्या. या सगळ्या प्रकारामुळे अखेर चित्रा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या पाठोपाठ आनंदही बाहेर पडले.
यानंतर सुरु झालेल्या चौकशीत चित्रा यांनी शेअरबाजाराची माहिती त्यांच्या हिमालयात राहणाऱ्या गुरुंना ईमेलव्दारे पाठवत होत्या, असे सांगितले. या हिमालयीन गुरुला कोणीही पाहिलेले नव्हते. हा हिमालयीन गुरु चित्रा यांना ईमेलव्दारे संदेश पाठवत होता. त्या संदेशानूसार चित्रा काम करत होत्या,असे त्यांनी सांगितले होते.
हळूहळू या चौकशीत असा कोणताही हिमालयीन गुरु अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले. आनंद हाच हिमालयीन गुरुची भुमिका बजावत असल्याचा संशय वाढत गेला. अखेर जवळपास आनंद हाच यातील मुख्य कटाचा सूत्रधार असावा, येथपर्यंत तपासणी यंत्रणा पोचल्या.
चित्रा यांना आनंद आणि हिमालयीन गुरु हे एकच आहेत, हे माहिती होते का ? आनंद आणि चित्राने मिळून या सगळा कट रचला होता ? का चित्रा यादेखील फसविल्या गेल्या होत्या असे काही प्रश्न निर्माण होत होते.
हा या कथेचा आजपर्यंतचा भाग. आजच्या भागात यापुढे काय घडले हे आता सांगतो.
काही पत्रकारांनी चैन्नईमधील आनंद सुब्रमण्यमच्या घराचा शोध लावला. चैन्नईमधील अतीशय पॉश परिसरातील हा २०८१ स्क्वे. मीटरचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट पाच मजली बिल्डिंगमध्ये आहे, या बिल्डिंगमध्ये फक्त ४ कुटुंबे राहतात, ज्यामध्ये एक तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारही आहे.
हा फ्लॅट चित्राने आनंदची पत्नी सुनिता हिला २३ फेब्रवारी २०२१ रोजी ३.२ कोटी रुपयाला विकल्याची माहिती या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकाला मिळाली आहे.
हा फ्लॅट चित्राने आनंदला २०२१ मध्ये विकला असला तरी आनंद या फ्लॅटमध्ये २०१० पासून रहात होता. हा फ्लॅट १४ जुलै २०१० रोजी चित्राच्या नावावर झाला होता.
वरील सगळ्या कंटाळवाण्या माहितीचा अर्थ असा आहे की चित्रा आणि आनंद २०१० पासून एकमेकांना ओळखत आहे.
आता तुमच्या लक्षात काही येतेय का ? या कथेतील व्हिलनचा चेहरा तुमच्या नजरेसमोर येतोय का नाही ?
२०१० पासून या ठिकाणी राहणाऱ्या आनंदला या परिसरातील फारसे कोणी ओळखत नाही. त्याच्या घराच्या आत या परिसरातील एकही माणुस कधीही गेलेला नाही. आनंद हा एनएसईमध्ये काम करत होता हेदेखील या परिसरातील कोणालाही माहिती नाही. आनंद त्याच्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या कामात सक्रिय होता, असे मात्र सांगण्यात येते.
आणखी एक मनोरंजक गोष्ट. सुनिता म्हणजे आनंदची पत्नी काही वर्षांपूर्वी एनएसईमध्ये एका महत्वाच्या पदावर काम करत होती.
या गुढकथेचा आणखी एक पदर आहे. अलिकडच्या काळात आनंद एका प्लॉटच्या खरेदीच्या कामात व्यग्र होता. आता या प्लॉटवर एका मोठ्या बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. हा प्लॉट एका सेशेल्समधील डॉक्टरचा होता. त्याला तो विकायचा होता. तो विकत घेतला सुनिताच्या चुलत बहिणीने.
आता सुनिताची ही चुलत बहिण कोण, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, चित्रा.
कोणत्याही लेखकाने लिहलेल्या गुढकथेपेक्षा या सगळ्या प्रकारात गुढ वाढत चालले आहे.
आता आजच्या या कथेच्या शेवटी तुम्हाला काय कळले.
आता या कथेतील ‘ हिमालयीन बाबा ‘ गायब झाला आहे. आता या कथेत नव्या पात्राने प्रवेश केला आहे, ती म्हणजे सुनिता. आता या कथेत एक, दोन नाही तर तीन सूत्रधार दिसत आहेत. एक चित्रा रामकृष्णा, दोन आनंद सुब्रम्हण्यम आणि तीन सुनिता सुब्रम्हण्यम .
अर्थातच या वास्तवातल्या गुढकथेचा हा शेवट नाही. हा फक्त आजचा भाग झाला. आणखी अनेक रहस्यांवरील पडदा अजून उचलायचा आहे.
त्यासाठी तुम्ही वाचत रहा महान्यूज लाईव्ह.