दौंड : महान्युज लाईव्ह
पुण्याची पीएमपीएलच्या हडपसर ते पाटस – कुरकुंभ या बस चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, पाटस टोल नाका प्रशासन आणि पीएमपीएमएल वाहतूक व्यवस्थापक यांची आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात तसेच पाटस परिसरातील सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी सकारात्मक चर्चा झाली. या बससाठी पाटस टोलनाका प्रशासनाकडून मासिक पासमध्ये सवलत देण्यात आली आहे.
२४ फेब्रुवारी रोजी पीएमपीएमएलच्या बसचे पाटस येथे मोठ्या थाटामाटात उद्घाटन माजी आमदार रमेश थोरात यांनी, तर कुरकुंभ येथे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र उद्धाटनानंतर ही बस दुसऱ्या दिवसापासून ही बंद झाली. मागील चार दिवसांपासून ही बस बंद असल्याने या बसमधुन प्रवास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थी, शेतकरी व प्रवासी यांची घोर निराशा झाली होती.
पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस येथील टोल नाक्यावर या बसकडुन टोल आकारण्यात आला. पाटस वरून कुरकुंभकडे जाण्यासाठी हा टोल भरावा लागणार होता. हा टोल पीएमपीएलच्या बसला आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने ही बस बंद करण्यात आली. टोलमध्ये सुट मिळावी यासाठी आजी – माजी आमदारांनी मार्ग काढावा, असे पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी ढमाले, नितीन शितोळे,पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे हर्षद बंदीष्ठी, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष वसंत सांळुखे, तालुकाध्यक्ष संजय शिंदे आदींनी पाटस टोल प्लाझा कंपनीचे व्यवस्थापक आणि पीएमपीएमएलचे व्यवस्थापक यांच्याशी सकारात्मक चर्चा घडवून आणली. मासिक पासमध्ये टोल आकारण्यासाठी सवलतीच्या दरात सुट देण्यात आली. यामुळे उद्घघाटानंतर बंद झालेली बस चार दिवसांनी का होईना चालू झाल्याने पाटस आणि कुरकुंभ परिसरातील विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, याबाबत हडपसर- शेवाळे डेपोचे वाहतूक व्यवस्थापक सोमनाथ वाघोले म्हणाले की, हडपसर ते कुरकुंभ पर्यंत २४ फेब्रुवारी रोजी बस सेवा चालू करण्यात आली होती. मात्र पाटस येथील टोल नाक्यावर टोल आकारण्यात येत असल्याने याचा आर्थिक दृष्ट्या परवडत नव्हते. मात्र टोल कंपनीने मासिक पास मध्ये सवलत दिल्याने हडपसर ते कुरकुंभ पर्यंत मंगळवारी ( दि.१ ) दुपारी ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तीन बस रोज नियमित धावणार आहे. हडपसर ते कुरकुंभ आणि यवत ते कुरकुंभ अशीही बस चालु करण्यात आली आहे. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास बसची संख्या आणि जादा फेऱ्याही वाढविण्यात येईल. प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.