राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील राहु येथील सकाळचे पत्रकार संतोष काळे आणि त्यांच्या पत्नी सिमा हे दोघे सोमवारी ( दि.२८ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक अगदी पन्नास फुटाच्या अंतरावर ऊस आणि कांदा पिकाच्या बांधावर दबा धरून बसलेल्या बिबट्याची मादी आणि दोन बछड्यांनी डरकाळी फोडली. काळे यांनी हातातील बॅटरीचा झोत त्यांच्याकडे फिरवली. यावेळी दोन बछड्यांचे तेज डोळे चमकलेले दिसले.. मादी बिबट्याने मोठ्याने डरकाळी फोडली.
या डरकाळीने संतोष काळे आणि पत्नी सिमा हे घाबरले. मात्र क्षणाचाही विलंब न लावता बिबट्या मादीच्या चेहऱ्यावरती बॅटरीचा उजेड चालूच ठेवला, तरीही बिबट्याने काळे यांच्यावर डरकाळी फोडत झेप घेतली. या प्रकारामुळे काळेही घाबरले. ते मोठमोठ्याने ओरडले. दोन्ही बॅटरींचा उजेड त्याच्या डोळ्यावरती एकटक लावूनच धरला. मोठ्याने आरडाओरड सुरुच ठेवली. बॅटरीच्या उजेडाने बिबट्याने त्याची दिशा अचानक बदलून दोन बछडांसह उसाच्या शेतात धूम ठोकली.
संतोष काळे यांच्या प्रसंगावधानाने ते बिबट्याच्या कुटुंबाच्या तावडीतून आपल्या कुटुंबासह बचावले. ते म्हणतात ना, वेळ आली होती पण काळ आला नव्हता. काळे यांनी त्याच क्षणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला मात्र त्यांनी फोन उचलला नाही.
संतोष काळे यांनी मंगळवारी पहाटे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घडलेला प्रसंग सांगितला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पायांच्या ठसे निदर्शनास आले. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले .. परिसरात बिबटयाचा वावर वाढलेला असून तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी मनोज शिंदे, प्रशांत शिंदे, संजय शिंदे, पांडुरंग खोरकर, गौतम इनकर, आनंदा काळे, सीमा काळे, पांडुरंग टेंगले, बापू शिंदे, संजय खोरकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याने परिसरातील अनेक पाळीव कुत्र्यांवर हल्ले करून यापूर्वी फडशा पाडला आहे. राहू बेट परिसरातील, देवकरवाडी, मगरवाडी, दहिटणे, मिरवडी, वाळकी, पारगाव परिसरात उसाचे अधिक क्षेत्र असल्याने बिबट्याला लपायला अधिक वाव मिळतो. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतातील पीकांना पाणी द्यायला जात नसल्याची परस्थिती आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा, फटके वाजवा. बॅटरीचा उजेड करा. बिबटया अचानक दिसल्यास पाठलाग करू नका. असे आवाहन वनविभागाचे अधिकाऱ्यांनी यांनी ग्रामस्थांना केले.
दरम्यान, पत्रकार आणि शेतकरी संतोष काळे आणि सीमा संतोष काळे यांनी सांगितले की रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतात पाणी द्यायला गेलो असता बिबट्याची मादी आणि दोन बछडे आमच्या अवघ्या ५० ते ६० फूटावर दबा धरून बसले होते. बिबट्याने मोठ मोठ्याने डरकाळी फोडली. हल्ला करण्यासाठी ते अंगावर झेप घेत होते. मात्र या संकटातून आमचा अक्षरश: दुसरा जन्म झाल्याच्या भावना सीमाआणि संतोष काळे यांनी व्यक्त केल्या.
दोन दिवसात बिबट्याच्या मादीला, बछड्यांना जेर बंद न केल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर अडवून गुलाब पुष्प देऊ. जर चुकून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला वन विभागाचे स्थानिक ते वरिष्ठ अधिकारीच जबाबदार राहतील. वन विभागाचे अधिकारी पिंजरा लावण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी मनोज शिंदे आणि प्रशांत शिंदे यांनी केली आहे.
दौंड तालुका वन परिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील त्यांनी फोन न उचलण्यास त्यांच्या सवयीप्रमाणे सोयीस्कर टाळाटाळ केली. दौंड वन विभागाचे अधिकारी नेहमीच मगरुरपणे वागतात. पिंजरा लावण्यासाठी आम्हाला जिल्हा पातळीवरून किंवा त्यांच्या वरिष्ठांकडुन परवानगी घ्यावी लागते. मगरूर गेंड्याची कातडी असणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यापुढे रस्त्यावर अडवून जाब विचारला जाईल.. याबाबत पुणे जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम बांदल यांनी केली आहे.