मुंबई : महान्यूज लाईव्ह
रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्याला आज पाच दिवस झाले. प्रचंड ताकदीने एकाच वेळी पाच सहा ठिकाणांवरून रशिया आपल्या अत्याधुनिक शस्त्र आणि वाहनांसह आक्रमण करतो आहे. रशियाने सोडलेले मिसाईल्स युक्रेनच्या शहरांना घायाळ करत आहेत. युक्रेनची सगळी शक्तीस्थळे उध्वस्त करण्याचा जणू विडाच रशियाने उचलला आहे.
या रशियन झंझावातासमोर युक्रेनियन नागरिक घरगुती पेट्रोल बॉम्ब घेऊन उभे आहेत. शहरा, शहरातून लोक रक्तदानासाठी रांगा लावल आहेत. आजपर्यंत कधीही एक गोळीही न उडवलेले लोक हातात रायफल्स घेऊन आपल्या शहरात रशियन सैन्याची वाट पाहत उभे आहेत.
या सगळ्यामध्ये हे युद्ध झलक दाखवत आहे, ते २१ व्या शतकातील युद्ध कसे असेल याची. हे युद्ध केवळ रणभूमीवर लढले जात नाही, तर साऱ्या जगभरात लढले जात आहे. ते केवळ शस्त्राने लढले जात नाही, तर आर्थिक, क्रीडा क्षेत्रासह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही लढले जात आहे. या युद्धाचे हे वेगळेपण दाखविणारी एक घटना घडली.
युक्रेनच्या मंत्र्यांनी आज अलन मस्क यांच्याकडे त्यांच्या उपग्रहांची ब्रॉडबॉन्ड सेवा मिळावी अशी मागणी व्टिटच्या माध्यमातून माध्यमातून केली. त्याला १० तासांनी अलन मस्क यांनी उत्तर देत युक्रेनसाठी आपल्या उपग्रहांवर आधारीत स्टारलिंक ब्रॉडबॉन्ड सेवा युक्रेनसाठी उपलब्ध करून दिली.
अलन मस्क यांच्या मालकीच्या २००० सॅटलाईटच्या माध्यमातून ते सगळ्या जगाला खाजगी इंटरनेट सेवा पुरवित असतात. रशियाने युक्रेनच्या इंटरनेट सेवेत अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचे युक्रेनच्या मंत्र्यांनी व्टिटरच्या माध्यमातून सांगितले. त्यामुळेच त्यांनी अलन मस्क यांची मदत मागितली. आजपर्यंतच्या युद्धांच्या इतिहासात न घडलेली ही गोष्ट आहे. आता हे युध्द इंटरनेटवर ताबा ठेवण्यासाठीही लढले जात आहे.
दुसरीकडे रशियाने आज जगातील सर्वात मोठे विमान मिसाईलहल्ला करून नष्ट केले. युक्रेनमध्ये तयार झालेले ‘ म्रिया ‘ नावाचे हे विमान जगातील सर्वाधिक मोठे होते. एएन – २२५ म्हणजेच म्रिया म्हणजेच स्वप्न या नावाचे हे विमान म्हणजे युक्रेनचा अभिमान होता. हा अभिमान रशियाने मिसाईल हल्ल्याने नष्ट केला आहे.
परंतू या हल्ल्यानंतर युक्रेनियन नागरिकांकडून सोशल मिडियावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, त्या अधिक चित्तवेधक आहेत. ‘ त्यांनी म्रिया नष्ट केले तरी ते आमचे स्वप्न नष्ट करू शकत नाहीत. खंबीर, मुक्त आणि लोकशाहीवादी युरोपीय देश म्हणून आम्ही ठामपणे उभे राहू. ‘ अशा शेकडोने प्रतिक्रिया युक्रेनचे नागरिक देत आहेत.
रशिया युक्रेनमधील इंटरनेटवर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असण्याचे कारण म्हणजे युक्रेनमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोचते आहे. ज्या खंबीरपणे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि युक्रेनचे नागरिक या भयंकर हल्ल्याला सामोरे गेले, त्याची सगळी माहिती या इंटरनेटनेच जगापर्यंत पोचविली. युक्रेनच्या अध्यक्षांनी व्टिटरचा ज्या पद्धतीने वापर केला, त्याचेही जगभरात कौतुक होत आहे.
दुसरे महायुद्ध आपण डोळ्यासमोर घडले नाही. पण स्टॅलिनग्राडच्या रस्त्यावर रस्त्यावर लढाई कशी खेळली गेली, त्याची वर्णने आपण वाचली आहेत. युक्रेनच्या शहरांतून लढली जाणारी हातघाई स्टॅलिनग्राडची आठवण करून देणारी आहे. पण स्टॅलिनग्राडमध्ये रशिया स्वत:च्या संरक्षणाची लढाई लढत होता, तोच रशिया आता बेलगामपणे दुसऱ्या एका देशातील शहरे उद्धस्त करत चालला आहे.