शिरुर : महान्यूज लाईव्ह
शिरूर पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंग महाराज यांच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने शिरूर शहरातून रामलिंग कडे प्रस्थान झाले.
” हर हर महादेव, रामलिंग महाराज की जय “, अशा प्रचंड जयघोषात अन ढोल ताशा अन सुमधुर बॅंड, टाळघोषांचा गजर, व हरिनामाचा नामघोष करत शिरूर शहरातुन जुने शिरूर ( रामलिंग ) चे जागृत देवस्थान श्री रामलिंग महाराज पालखीचे मोठ्या भक्तीभावाने प्रस्थान झाले. संपुर्ण शहराच्या मुख्य बाजारपेठेतुन सवाद्य मिरवणुक पालखीचे जुन्या शिरुर ( रामलिंग ) कडे मार्गक्रमण झाले.
शिरूर पंचक्रोशीचे जागरूक देवस्थान रामलिंग महाराज यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी जुने शिरूर ( रामलिंग ) येथील मंदिरात यात्रा भरवली जाते. त्या अगोदरच्या दिवशी या यात्रेच्या पालखीचा मान शिरूर शहराला असतो, तर यात्रेचा मान शिरूर परिसरातील पंचक्रोशीला असतो.शिरूर शहरातील शिवसेवा मंदिरात जगप्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते महाआरती करून पालखी सोहळ्यास दुपारी सुरुवात झाली. यावेळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हजेरी लावली. प्रथेप्रमाणे पालखी सोहळ्याचे स्वागत नगरपरिषदेच्या वतीने पालखीस पुष्पहार घालून स्वागत केले.
पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून या पालखी सोहळ्यात अनेक युवक व नागरिक सामील झाले असून उत्साह पाहण्यात येत आहे.