राजेंद्र झेंडे
महान्यूज लाईव्ह : संपादकीय
दौंड तालुक्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात कृषी पंपाच्या थकीत वीज बिलावरून होणारा वाद हा दिवसेंदिवस चांगलाच पेटत चालला आहे. गेली बारा वर्षापासूनची कृषी पंपाची वीज बिले ही थकीत आहेत. ही थकीत वीज बीले वीज भरण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी आता शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावरील रोहीत्रांवरील वीज जोड तोडून ती बंद करण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार,विद्युत पंप, मीटर
असे साहित्य ते जप्त करीत आहेत. मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीने ही मोहीम राबवली आहे. यास दौंड तालुक्यातील शेतकरी विरोध करीत आहेत. दौंडच्या पुर्वभागातील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राजाभाऊ कदम यांनी शेतकऱ्यांच्या सोबत दौंड पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या अधिका-यांवर चोरीचा गु्न्हा दाखल करण्यासाठी आंदोलनही केले. पोलीसांनी मध्यस्थी करीत हे प्रकरण मिटवले.
महावितरण कंपनीने वीज तोड मोहीम चालूच ठेवली परिणामी शेतक-यांच्या शेतातील उभी पिके वीज आणि पाण्याअभावी जळू लागली. कांद्याच्या रोपांची लागवड करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतमजुर महिला दिवसभर बसून राहिल्या,कांद्याची रोपे जागीच जळून गेली. उसासारखी हिरवीगार उभी पिके जळू लागली. भीमा नदीच्या काठावरील गावांमध्ये ही परिस्थिती होती तर मग तालुक्यातील दुष्काळी भागात काय परिस्थिती असेल याची कल्पना करा. पोटच्या पोरांप्रमाणे शेतपिकांना शेतकरी संभाळत असताना शेतातील उभी जळू लागल्याने आणि लाखो रूपयांचे नुकसान होउनही शेतकऱ्यांनी संयम राखला.अशा परिस्थितीत महावितरण कंपनीचे अधिकारी तालुक्यातील कानगाव येथे वीज बंद करण्यासाठी गेले. त्यास परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यातून झालेल्या शाब्दिक चकमकीतून संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आणि महावितरण व शेतकरी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली ती आज दौंड तालुक्यात उग्र रूप घेताना दिसत आहे. तालुक्यात महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. महाविरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने ही थांबेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र महावितणने ही कारवाई सुरूच ठेवल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालया समोर ठिय्या, धरणे आंदोलन करीत आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र असंतोष पहावयास मिळत आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवर अन्याय करीत असताना तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते बघ्याची भुमिका घेत असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करू लागले. गेली बारा वर्षाची थकीत बीले आम्ही एकदम कशी भरणार, आता यम जरी आला तरीही थकीत बीले आम्ही भरणार नाही आणि चालु बिलेही भरणार नाही अशी भुमिका शेतक-यांनी घेतली आहे. उलट वीज बिले माफ करावीत अशी मागणी शेतकरी संघटना करीत आहेत.
ब्रम्हदेव आला तरी वीज बिल माफ होणार नाही.. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सध्या भाजप आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले असून तालुक्यात रान पेटवले आहे. महाविकास आघाडी हे शेतक-यांच्या विरोधात भुमिका घेत आहेत.अजित पवार यांच्या आदेशावरूनच ही वीज बिल वसुली आणि सरसकट वीज तोड मोहीम सुरू असल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत. या संधीचा फायदा उचलत आणि आगामी निवडणुकी डोळ्यासमोर ठेवत दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांनी महावितरण कंपनीला वीज तोड मोहीम थांबवा आणि जरा सबुरीने घ्या, असा सल्ला दिला. मात्र आमदारांच्या या आदेशाला महावितरणने केराची टोपली दाखवली आणि सरसकट वीज तोड मोहीम सुरूच ठेवली.परिणामी महावितरण कंपनी आणि शेतकरी यांच्यातील बांधावरील वाद रस्त्यावर येवू लागला. त्यातच महाविकास आघाडीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केल्याच्या निषेर्धात राष्ट्रवादीने पाटस येथे केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या आणि आघाडी सरकारच्या या भुमिकेवर माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला आघाडीच्या राज्यसरचिटणीस वैशाली नागवडे यांनी याबाबत खंत व्यक्त करीत महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला. राष्ट्रवादी सत्ता असली तरीही गप्प बसून चालणार नाही त्याच दिवशी माजी आमदार रमेश थोरात यांनी कार्यकर्त्यांसमवेत थेट केडगाव येथील महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले आणि महावितरणला निवदेन दिले. शेतकऱ्यांवर सुरू असलेला अन्याय थांबवा अन्यथा मला रस्त्यावर उतरावे लागेल. तर दुसरीकडे माजी आमदारांनी निवेदन देताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही निवेदन देऊन महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला.
दरम्यान, त्याच दिवशी पाटस येथे शेतक-यांनी वीज तोडण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घातला. प्रकरण पोलीस चौकीत गेले. पोलीस चौकीतच या अधिका-यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले तिथेही पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी हे प्रकरण हाताळले आणि मध्यस्ती करीत तोडगा काढला. मात्र तरीही तालुक्यात इतर ठिकाणी महावितरण कंपनीची वीज तोड मोहीम सुरूच होती.अखेर रावणगाव, खडकी,बोरीबेल,कौठडी,मळद या भागातील शेतक-यांनी पुणे सोलापुर महामार्गावर रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. राहु येथेही महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले. इंदापुर,दौंड तालुक्यात वीज तोड मोहीम सुरू आहे तर मग बारामती तालुक्यात एकाही शेतकऱ्यांवर ही कारवाई का झाली नाही? असा सवाल करीत शेतकरी संघटनांसह भाजप,राष्ट्रीय किसान मोर्चा ही शेतक-यांच्या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी महावितरण आणि महाविकास आघाडीच्या विरोधात तालुक्यात वातावरण चिघळू लागले आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका या काही दिवासांवर येवून ठेपल्या आहेत.याच पाश्वभुमीवर महावितरण कंपनीने ही वीज तोड मोहीम सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. या संधीचा चांगला फायदा भाजपने घेत तालुक्यात महाविकास आघाडी विशेष करून राष्ट्रवादीच्या विरोधात रान पेटवले. भाजपचे ग्रामिण भागातील कार्यकर्ते सक्रीय झाले आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची कोंडी झाली. तसा महावितरणच्या भुमिकेवर राष्ट्रवादीतही प्रचंड नाराजी आहे मात्र राष्ट्रवादी सत्तेत असल्याने आवाजही उठवता येत नसल्याची खंत त्याच्या समोर होती. भाजप सत्तेत असताना ही वीज बिले थकीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाती ही बिले थकीत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीने केला आहे. मात्र या निमित्ताने तालुक्यातील गटातटाचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले. महावितरण कंपनीने शेतक-यांना दिलेला हा शॅाक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी आता कोणाचा फ्युज उडविणार हे बघावे लागणार आहे. महावितरण कंपनीने दिलेल्या या संधीचा फायदा तालुक्यात
भाजपला किती होणार हे बघावे लागणार आहे.
तालुक्यात आमदार कुल व थोरांताना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा आहे की आगामी निवडणुका लक्षात घेवून राजकारण केले जात आहे हे समजण्या इतपत तालुक्यातील शेतकरी सुज्ञ आहेत. मात्र ते काहीही असो, केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची असो. तालुक्यातही कोणत्याही गटाचे वर्चस्व असो, मात्र शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना चोवीस तास वीज आणि पाणी मिळाले पाहिजे, त्यांच्या शेतीमालास रास्त बाजार दर मिळायला हवा, जगाचे पोट भरणाऱ्या या बळीराजाची दुसरी कसलीच अपेक्षा नाही.