सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
ई श्रम कार्डमुळे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असून सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती गटनेते कैलास कदम यांनी दिली.
सर्व असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारचे मोफत श्रमिक लेबर कार्ड योजना राबवली जात असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा अंकिता शहा आणि गटनेते कैलास कदम यांच्या पुढाकारातून रविवारी दि.२७ फेब्रुवारी रोजी इंदापूर शहरातील श्रीराम चौकातील श्रीराम मंदीरात हे शिबीर पार पडले.भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी कदम बोलत होते.
कदम म्हणाले की,ई श्रम कार्डमुळे सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल. त्या धोरणांचा फायदा त्यांनाच होईल. नोंदणी केलेनंतर दोन लाखाचा अपघाती विमा व अपंगत्व आलेस एक लाख रूपयाचे आर्थिक मदत सरकारकडून केली जाईल. तसेच असंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
कदम म्हणाले की,पशुपालन करणारे,सलून कामगार / ब्युटीशियन,हातगाडी ओढणारे,बिडी कामगार,घरगुती कामगार, ऑटो रिक्षा चालक, बांधकाम कामगार,सर्व प्रकारचे फेरीवाले, इलेक्ट्रिशयन,सफाई कामगार, सर्व प्रकारचे ड्रायव्हर, शिवणकाम कामगार,वेटर,शेतमजूर, लहान आणि सीमांत शेतकरी ,अंगणवाडी /आशा सेविका, सर्व प्रकारचे मेकॅनिक,मच्छी विक्रेते,लेदर कामगार, भाजीपाला विक्रेते,दूध उत्पादक शेतकरी,फळ विक्रते आदी प्रकारच्या असंघटित कामगारांची शासन दरबारी यातून नोंद करुन त्यांकरीता केंद्र सरकार स्वतंत्र विविध योजना राबवण्याच्या विचारधीन आहे.ज्यांनी ई श्रम कार्ड काढून आपली नोंद शासन दरबारी केली असेल अशांना या विविध योजनांचा लाभ मिळेल.त्याकरिता शहरात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बच्चू कांबळे,अंकुश डांगे,अमोल भिसे,प्रा.इस्माईल जमादार,सुरज शहा,सचिन कदम,गणेश जगताप,प्रविण शिंदे,अमजद शेख,सादिक शेख उपस्थित होते.