सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या इतर मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून छत्रपती युवराज संभाजीराजे हे मुंबई आजाद मैदान येथे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ व उपोषणाला पाठिंबा देण्याकरता इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोमवारी इंदापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण होत आहे.
मराठा समाज बांधव आज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे इंदापूर तहसिल कार्यालय येथे उपोषणाला बसणार आहेत.मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. समाजाच्या वतीने विविध मोर्चे आंदोलने करून देखील अद्याप पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघाला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन छत्रपती युवराज संभाजीराजे हे मुंबई आजाद मैदानात आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास इंदापुरात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे.कोपर्डीतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी.मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या.भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तत्काळ सुरूवात करून, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी.ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा २५ लाख रुपये करण्यात यावा. महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकिय निर्णय घेण्यासाठी तसेच नविन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ नियुक्त करावे व मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे, आदी मागण्या घेऊन इंदापूर शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषणाचा इशारा दिला आहे.