दौंड : महान्युज लाईव्ह
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दौंड तालुका मराठा क्रांती मोर्चा वतीने मंगळवारी ( दि.१ ) रोजी दौंड बंद ची हाक दिली आहे.
मागील कित्येक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या मागणीसाठी मराठा समाजाचे राज्यभर लाखोंचे मोर्चे निघाले होते.लाखो मराठा समाज शांततेत रस्ता वर उतरले होते. या संदर्भात सर्वाच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या विरोधात निकाल दिल्याने पुन्हा एकदा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
खासदार संभाजीराजे या मागणीसाठी सातत्याने आग्रही राहिले असुन आक्रमक भूमिका घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांची भेट ही घेतली होती. आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागण्यांची अंमलबजावणीसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे मुंबई येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ दौंड बंदची हाक देण्यात आली असून दौंडकरांनी व व्यापारी संघटनांनी बंद मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. याबाबत दौंड तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले आहे असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.