शिरुर : महान्यूज लाईव्ह
रशिया व युक्रेन युध्दामुळे युक्रेन येथील खारकिव येथे वैद्यकिय क्षेत्रातील एमबीबीएस हे पदवी शिक्षण घेण्यासाठी गेलेले शिरूर तालुक्यातील आठ विद्यार्थी अडकले असुन त्यांचे पालक मुलांना घरी आणण्यासाठी चिंतातुर झाले आहेत.
युक्रेन येथील खारकिव नॅशनल मेडिकल युनिव्हरसिटी , खारकिव येथे शिरूर तालुक्यातील एकुण दोन मुली व सहा मुले एमबीबीएस या वैद्यकिय क्षेत्रातील उच्च पदवी शिक्षणासाठी असुन त्यामध्ये शिरूर शहरातील सौरभ दादासाहेब गवारी, सिद्धी फटांगडे ,प्रकर्षा कन्हैयालाल दुगड, व टाकळी हाजी ( ता . शिरूर )येथील मुसळे प्रतिक रावसाहेब, उचाळे विशाल विलास, शितोळे सुशांत लहु तसेच वडनेर ( ता.शिरूर ) येथील आदित्य अर्जुन निचित व अशिष विजय वराळ या आठ जणांचा समावेश आहे.
मुलांशी भ्रमण ध्वनीवरुन झालेल्या संपर्कात पालकांनी सांगितले की, याबाबत आम्ही शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार , जिल्हाधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी माजी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला आहे.
रशियाचे सिमारेषेपासून ६० किमी अंतरावर खारकिव हे शहर असुन या युद्धजन्य परिस्थितीचा तेथे जास्त झळ बसलीआहे, त्यामुळे तेथील एटीएम, मॉल बंद आहेत, मुलांकडे पैसे नसून खाण्याचे हाल होत आहेत तसेच त्यांना बाहेर पडता येत नाही व कुठली खरेदी करता येत नाही. त्यांना बंकरमध्ये ठेवण्यात आले असून रेंज प्रॉब्लेममुळे व्यवस्थित बोलणे होत नाही. आम्हाला येथुन घेऊन जा अशी याचना मुले करत आहेत.
रशिया व युक्रेन शहराच्या सीमा रेषेवर खारकिव हे शहर असुन या युध्दाच्या परिस्थितीत होत असलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे मुले घाबरली असून यातील शिरूर शहरातील मेडिकल व्यवसायिक कन्हैयालाल दुगड यांची मुलगी प्रकर्षा हिला तिचे पालकांनी संपर्क साधला असता ‘ पप्पा मला घेऊन जा ‘ अशी आर्त हाक ती आपल्या वडिलांना देत आहे.