राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात महावितरण वीज कंपनी आणि शेतकरी यांच्यात थकीत कृषी पंपाच्या वीज बिलावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चांगलाच पेटत चालला आहे.
रविवारी रावणगाव येथे पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर शेतक-यांनी आक्रोश आंदोलन केले. बारा तासांच्या आत वीज पुरवठा चालु न केल्यास
प्राणघातक उपोषण करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला दिला.
दरम्यान, महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी वीज पुरवठा सुरू करण्याचे व हप्ताने वीज बील भरण्यासाठी मुदत वाढ देण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आहे. दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी महावितरणचे अधिकारी आणि आंदोलक शेतकरी यांच्यात सकारत्मक चर्चा करून तोडगा काढल्याने संतप्त शेतक-यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
दौंड तालुक्यातील रावणगाव,खडकी,बोरीबेल,कौठडी, मळद आदी भागातील शेतक-यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने रोहीत्रांमधून बंद केल्याने संतप्त शेतक-यांनी पुणे – सोलापूर महामार्गावरील रावणगाव येथे रविवारी ( दि.२७ ) रास्ता रोको आक्रोश आंदोलन केले. महावितरण कंपनीचे अधिकारी आंदोलनस्थळी येत नसल्याने संतप्त शेतक-यांनी महामार्ग रोखण्यासाठी धाव घेतल्याने काही वेळ वातावरण तणावग्रस्त झाले होते. मात्र,सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आणि पोलीसांनी हस्तक्षेप करीत
आंदोलनकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे सांगितल्याने वातावरण शांत झाले. महामार्गावरील सेवा रस्त्यावर ठाण मांडत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॅांग्रेसचे सरचिटणीस
पांडुरंग मेरगळ म्हणाले, महावितरण कंपनीने वीज बिल भरून वीज पुरवठा बंद केला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सप्टेंबर २०२० पासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंतची थकीत बील तसेच यापुर्वीचे थकीत कृषीपंपाची वीजबील भरण्याचे सांगत आहेत. मात्र एवढ्या वर्षे बिले थकीत होत असताना
महावितरण काय झोपले होते काय ? शेतकरी फक्त चालु वीज बील भरतील. सप्टेंबर २०२० पुर्वीची बिले भरणार नाहीत. महावितरणच्या अधिका-यांनी सक्तीने आणि वीज बंद करून अन्याय करीत असेल तर सहन केले जाणार नाही. वीज पुरवठा बंद
करण्याची मोहीम बारा तासाच्या आत थांबवून वीज पुरवठा सुरळीत न केल्यास प्राणघातक उपोषण केले जाईल असा इशारा यावेळी पांडुरंग मेरगळ यांनी दिला.
तर भाजप किसान मोर्चाचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैभव आटोळे म्हणाले की,कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडला. पुरेशी वीज नाही, पाणी नाही, शेतमालास बाजार दर नाही, या सर्व संकटाना बळीराजाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी तरी किती सहन करायचे, शेतकऱ्यांच्या सहनशिलता संपत चालली आहे.महावितरण कंपनीने वीज खंडीत करू नये. शेतपिकांचे मोठे नुकसान होत असून यास महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत.
खडकीच्या सरपंच कुमारी स्नेहल काळभोर,अॅड बापु भागवत, अॅड. श्रीकांत गुंड,डॅा.राजेंद्र शिंगाडे,लक्ष्मण रांधवण,ग्यानबा आटोळे,कल्पना रांधवण,सिता आटोळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. दरम्यान,यावेळी दौंड महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे यांनी सांगितले की,सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२२ पर्यंतची थकीत वीज बिले भरावी लागतील.जुने आणि चालू वीज बिले माफ होणार नाहीत. थकीत वीज बिले ३१ मार्च पर्यंत भरावीच लागतील. यावर शेतकऱ्यांनी २००९
ते सप्टेंबर २०२० पर्यंतची बिले भरणार नाही. चालु वीज बिले भरू ती पण हप्त्याने,जूनी बिले भरणार नाही.बंद केलेल्या वीजपुरवठा त्वरीत चालू करावा असा पवित्रा घेतला.