शिरूर : महान्यूज लाईव्ह
मराठी ही आपली मातृभाषा जगाच्या पाठीवर वैभवशाली भाषा असून आपण सर्वांनी व्यवहारात मराठीचा आग्रह धरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हास्य अभिनेते व कवी बंडा जोशी यांनी केले.
तळेगाव ढमढेरे, ता. ( शिरूर ) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिन समारंभ व युवांकुर भित्तीपत्रक आणि पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्धघाटन आज बंडा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे, डॉ. दत्ता कारंडे , डॉ. पराग चौधरी , डॉ. पद्माकर गोरे ,डॉ. दत्तात्रय वाबळे , डॉ. मनोहर जमदाडे , डॉ. सोमनाथ पाटील , डॉ अमेय काळे , डॉ विवेक खाबडे , प्रा. सुमेध गजबे , डॉ रवींद्र भगत , प्रा मिनाक्षी दिघे , प्रा.अजिता भुमकर , प्रा.निलेश आढाव , प्रा.निलेश पाचुंदकर , डॉ. प्रमोद पाटील , डॉ. दीपाली खोडदे , प्रा. सुप्रिया साकोरे ,माधवी चौधरी , प्रीती सावंत याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जोशी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भाषा वापरण्याच्या संदर्भात असलेला न्यूनगंड दूर होणे गरजेचे आहे. कोणतीही बोलीभाषा ही समृद्ध असते. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेतून विचारांची देवाण-घेवाण केली तर निश्चितपणे आपल्या मराठी भाषेला वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम व युवांकुर भित्तीपत्रकाच्या माध्यमातून तळेगाव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विभाग राबवत असलेल्या कल्पक योजना निश्चितपणे युवकांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देतील असा आशावादही श्री. बंडा जोशी यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या एकपात्री अभिनयातून व वेगवेगळ्या हास्य कवितांतून श्री. जोशी यांनी उपस्थित युवक-युवतींना मंत्रमुग्ध केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगताद्वारे महेशबापू ढमढेरे यांनी युवकांना भाषेचा अभिमान बाळगण्याचा सल्ला दिला. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विचार व लेखणीतून प्रत्येक युवकाने प्रेरणा घेणे गरजेचे असून लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येकाने वाचनाकडे वळण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. ज्ञानोबा तुकोबांची समृद्ध परंपरा असलेली आपली मराठी भाषा काळाच्या ओघात मागे पडत चालली आहे. इंग्रजी माध्यमाच्या अतिक्रमणामुळे समृद्ध परंपरा असलेल्या मराठीचे जतन व संवर्धन करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या भूमिकेतून मराठी विभाग राबवत असलेल्या युवांकुर भित्तीपत्रक व पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यास वर्गाच्या आयोजनाबाबत त्यांनी कौतुक केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्ताने महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या काव्यवाचन आणि गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गीतगायन स्पर्धेत पोवाडा सादर केलेल्या अपेक्षा भुजबळ , निशा भुजबळ , भाग्यश्री सुतार , अंजली गोगरकर यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. कु. शिवाली गरुड हिला द्वितीय तर कु. प्रीती सावंत या विद्यार्थीनीला तृतीय क्रमांक मिळाला. निकिता कदम आणि अमर सूर्यवंशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी प्रास्तविक केले. तर श्रद्धा करेकर यांनी सूत्रसंचालन केले.
गीतगायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. प्रमोद पाटील व डॉ. दीपाली खोदडे यांनी काम पाहिले. डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी आभार मानले.