घनश्याम केळकर
भविष्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा हे माणसाच्या स्वभावाचे एक लक्षण असले तरी नियती अशा काही गिरक्या घेते की भविष्याचा वेध घेण्यासाठीचे मानवी प्रयत्न किती तोकडे आहेत, याची जाणीव होते.
व्हाल्दिमीर झेलेंन्स्की असल्या आपल्या देशातील लोकांना उच्चारण्यासाठीही अवघड नावाचा कुणीतरी जगातील कुठल्यातरी देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे, याची माहिती युक्रेन आणि आसपासचे देश सोडले आणि रशियाच्या आसपासच्या राजकारणावर नजर ठेवणारे अभ्यासक आणि सुरक्षा एजन्सीज सोडल्या तर कुणाला असण्याचे काही दिवसांपर्यंत कुणाला काही कारणच नव्हते.
आणि जर रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर चार दिवस झाल्यानंतरही रशियन सैन्याने वेढलेल्या राजधानी किव्हमध्येच ठाम उभे राहून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रशियाला आणि जगालाही संदेश देत नसते तर हे नाव आजही कुणाच्या लक्षात राहण्याचे काहीच कारण नव्हते. पण शहरात घुसणारी रशियन लष्करी वाहने आणि सैनिक, शहर आणि देश सोडून जाण्यासाठी धावपळ करणारे युक्रेनीयन नागरिक, शहरातील इमारतींवर धडाधड येऊन पडणारे मिसाईल्स यांच्यात उभे राहून ‘ मी किव्ह सोडून जाणार नाही, मी इथेच राहून रशियाशी लढणार आहे. ‘ असे म्हणणारा हा माणुस ज्यावेळी टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसू लागला, त्यावेळी त्याच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे शोधण्यासाठी साऱ्या जगातील करोडो लोक धडपडू लागले.
काही महिन्यांपूर्वीच अफगाणीस्थानच्या राजधानीत तालिबान पोचण्यापूर्वीच तेथून आपला बाडविस्तारा आवरून विमान पकडून पलायन करणारे तिथले राष्ट्राध्यक्षही याच जगाने पाहिले होते. पळून जाण्यापूर्वी तेदेखील अशीच लढण्याची भाषा करत होते. युक्रेनबाबतही बहुतेक जगाची अशीच अपेक्षा होती. परंतू आजपर्यंततरी व्हाल्दिमीर झेलेंन्स्की याउलट ठामपणे उभे राहिलेले दिसताताहेत. यामुळे हा माणूस आहे तरी कोण, याचा परिचय करुन घेण्याची ओढ जगभरातील लोकांना लागली आहे.
व्हाल्दिमिर हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून २०१९ मध्ये नियुक्त झाले. त्यापुर्वी युक्रेनला ते एक टिव्ही स्टार आणि कॉमेडियन म्हणून परिचित होते. ते जन्माने ज्यू असून त्यांच्या आजोबांनी दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीविरोधात सोव्हियत रशियाच्या सैन्यात राहून लढा दिला होता. यामुळेच ज्यावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ‘ मी नाझींविरोधात लढाई पुकारली आहे.’ अशी घोषणा केली त्यावेळी व्हाल्दिमिर यांनी त्यांच्या या आजोबांचा दाखला देत ‘ मी नाझी कसा असू शकतो.’ असा प्रतिप्रश्न टाकला.
देशात प्रचंड वाढलेल्या भ्रष्टाचाराचा खातमा करण्याच्या अपेक्षेने युक्रेनने व्हाल्दिमीर यांना प्रचंड बहुमताने अध्यक्षपदी बसवले. पण पुढे व्हाल्दिमीर यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांची प्रतिमा मलिन झाली. युद्धाला सुरुवात होण्यापुर्वी युक्रेनमधील त्यांची लोकप्रियता चांगलीच घसरणीला लागली होती. परंतू रशियन आक्रमणाविरोधात ते ज्या ठामपणे उभे आहेत, त्यानंतर युक्रेनच नव्हे तर जगभरात रातोरात त्यांचे करोडो करोडो प्रशंसक उभे राहत आहेत. युक्रेनमधील त्यांचे राजकीय विरोधकही एकमुखाने त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.
अर्थात गेले चार दिवस व्हाल्दिमीर यांनी तग धरला असला तरी त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस कसोटीचा आहे. युक्रेनच्या तुलनेत रशियाची लष्करी ताकद अफाट आहे. व्हाल्दिमीर यांना ज्या युरोप आणि अमेरिकेवर भरवसा होता, ते प्रत्यक्ष लष्करी मदत पाठविण्यास आजही तयार नाहीत. अशा परिस्थितीत दररोज शेकडोंच्या संख्येने येत असलेल्या आणि काही दिवसात हजारोंच्या संख्येने येऊ पाहणाऱ्या रशियन लष्करी टोळधाडीमुळे त्यांना कदाचित किव्ह सोडावेही लागू शकते. पण जितके जास्तीत जास्त तास ते या शहरात टिकून राहतील, तेवढी त्यांच्याबद्दल सहानूभुती असणाऱ्यांची संख्या वाढत जाईल एवढे नक्की.
रस्त्या रस्त्यावर लढली जाणारी ही लढाई किव्ह शहराच्या इतिहासात पहिली नाही. यापूर्वीही नाझी जर्मनीने केलेल्या आक्रमणावेळी किव्हने असाच लढा दिला होता. त्यावेळीही हजारोंच्या संख्येने रशियन सैन्याने आत्माहूती दिली होती. आता इतिहासाने करवट घेतली आहे. आता रशियाच्या आक्रमणाविरोधात किव्ह लढते आहे. आणि या लढ्याला स्फुर्ती देणारे जे नेतृत्व आहे ते राष्ट्राध्यक्ष व्हालिमीर झेलेंन्स्की यांचे आहे.
अमेरिकेने त्यांच्यापुढे शहर सोडून जाण्याचा ठेवलेला प्रस्ताव ठोकरून लावताना ‘ आम्हाला शस्त्रे हवी आहेत. तेवढीच मदत करा .’ असे म्हणणाऱ्या या माणसाने दिलेल्या हाकेला ओ देऊन हजारो युक्रेनियन तरुण हातात शस्त्र उचलून रशियाशी लढण्यास सज्ज झालेले दिसत आहेत. कितीही आधुनिक शस्त्रसाम्रगी असली तरी एखादा प्रदेश ताब्यात घेण्यासाठीचे अखेरचे युद्ध जमिनीवरच लढावे लागते, आणि जर तेथील जनता प्रतिकाराला उतरली तर कोणताही बलाढ्य शत्रूही जेरीस येऊ शकतो हे इतिहासाने अनेकदा दाखवून दिले आहे. बलाढ्य अशा अमेरिकेला २० वर्षाच्या युद्धानंतरही अफगाणीस्तानातून कसा गाशा गुंडाळावा लागला हे काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिले. दुसरे उदाहरण आजच्या आक्रमक रशियामधील स्टॅलिनग्राडचे आहे. स्टॅलिनग्राडच्या रस्त्यावर लढल्या गेलेल्या लढाईने जर्मन फौजांच्या नाकी दम आणला आणि अखेर जर्मनांना माघार घेण्यास भाग पाडले. आपल्या अतूट अशा मनोधैर्याच्या बळावर प्रचंड ताकदीच्या शत्रूवर विजय मिळविणाऱ्या अनेक नायकांची इतिहासाने नोंद केली आहे. व्हाल्दिमीर झेकेंन्स्कीही या मार्गावरून वाटचाल करताना आज दिसत आहेत.