महान्यूज लाईव्ह विशेष
सर्व प्रसार माध्यमांनी साफ दुर्लक्ष केलेल्या एनएसईमधील घोटाळा प्रकरणाने आता आणखी एक आश्चर्यकारक वळण घेतले आहे.
भारतातील कंपन्यांना भांडवल पुरवठ्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा कारभार जवळपास तीन वर्षे एका ‘ हिमालयीन गुरु ‘ च्या आदेशाने होत होता. अतीशय संवेदनशील अशी माहिती या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या चित्रा रामकृष्ण ईमेल व्दारे या अज्ञात व्यक्तीला पाठवत होत्या. त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्या निर्णय घेत होत्या. त्यामुळे ज्यामुळे करोडो रुपयांचा नफा किंवा नुकसान होऊ शकते अशी माहिती या संस्थेबाहेरील व्यक्तीपर्यंत पोचत होती.
२०१३ ते १६ या कालावधीत झालेल्या या प्रकाराला नंतर वाचा फुटली. चित्रा रामकृष्णा यांना राजीनामा द्यावा लागला. आता २०२२ मध्ये या सगळ्या प्रकाराचा तपास सुरु झाला आहे. यामध्ये तपास यंत्रणांना आजपर्यंत अज्ञात असलेला ‘ हिमालयीन गुरु ‘ आहे तरी कोण, या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते.
परंतू आता या हिमालयीन गुरुच्या चेहऱ्यावरील पडदा हटला आहे. हा हिमालयीन गुरु दुसरा तिसरा कुणी नसून एनएसईचा माजी चीफ ऑपरेटींग ऑफिसर आनंद सुब्रम्हण्यम हाच असल्याचे उघड होत आहे.
हा सगळाच प्रकार फार चक्रावून टाकणारा आहे. चित्रा रामकृष्णा यांच्या मते हिमालयीन गुरुने त्यांना आनंद सुब्रम्हण्यम यांना प्रथम सल्लागार म्हणून एनएसईत घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर याच गुरुच्या आदेशानूसार आनंद यांना चीफ ऑपरेटींग ऑफीसर म्हणून नेमले. या सगळ्या प्रकारात दुसऱ्या कंपनीत १५ लाख वार्षिक पगार मिळवणाऱ्या एनएसईत आनंदला प्रथम १.४ कोटीचे वार्षिक पगार मिळाला. ज्यावेळी त्याने एनएसई सोडली त्यावेळी तो पगार ५ कोटी वार्षिक पगाराच्या आसपास पोचला होता.
आता हा हिमालयीन गुरु म्हणजे आनंदच होता, हे स्पष्ट होत आहे. म्हणजे आनंदने स्वत:लाच एनएसईत नेमण्याचा हिमालयीन गुरु बनून आदेश दिला होता.
आता हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. यातील अजून एक बाब स्पष्ट होत नाही, ती म्हणजे चित्रा रामकृष्णा यांना हिमालयीन गुरु म्हणजेच आनंद सुब्रम्हण्यम होते हे माहिती होते की अध्यात्माच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली होती.
आतापर्यंत या सगळ्या प्रकरणाने अनेक नाट्यमय वळणे घेतली आहेत. आता यापुढे आणखी काय काय घडते ते आता पहावे लागेल.