सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील कोणत्याही गावात,वाडी वस्तीवर मंजूर कामांची उद्घाटने करायला गेल्यावर त्या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस, महिला भगिनी, युवक वर्ग आनंदी मनाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे स्वागत करतो, त्यावेळेस मला माझ्या कामाची पोचपावती मिळाल्याचे समाधान वाटते.. त्यामुळे जनतेच्या चेह-यावरील समाधान हीच माझ्या कामाची प्रसिध्दी असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून मंजूर असलेल्या डिकसळ गावातील ४ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात भरणे बोलत होते.
दरम्यान डिकसळ ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत राज्यमंत्री भरणे यांची घोड्यावरून जंगी मिरवणूक काढण्यात आली.
भरणे म्हणाले की देशाचे नेते आदरणीय शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकीय व सामाजिक जीवनात अनेक पदांवरती काम करण्याची संधी दिली. आज राज्यातील विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या खंबीर साथीने इंदापूर तालुक्यातील गाव, वाड्या वस्त्या या ठिकाणी निधी आणताना एखादेवेळी उपाशी रहाण्याची वेळ येते, परंतु ज्या जबाबदारीने व विश्वासाने इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे मला आमदार, मंत्री केले. त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सार्थकी लावायचे, हा संकल्प माझ्यासारख्या कार्यकर्त्याने मनाशी ठरवला आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची प्रत्येक क्षणी काळजी घेण्याचे काम करत असल्याचे भरणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रतापराव पाटील, जेष्ठ नेते डी.एन.जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, इंदापूर तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, इंदापूर तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रावसाहेब गवळी, इंदापूर तालूका कुंभार संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण कुंभार यांच्यासह डिकसळ गावातील सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.