मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही वर्षापासून आपण पाहतो आहे की, जगात कुठेही काही संकट आले की, तिथल्या भारतीयांना परत देशात कसे आणता येईल याच्या चर्चा सुरु होतात.
कोरोना सुरु झाला त्यावेळी चीनमधील भारतीयांबाबत बातम्या येत होत्या. त्यानंतर युरोपात कोरोना पसरला, त्यावेळी युरोपातील भारतीयांच्या बातम्या येऊ लागल्या. आखाती देशात कधीही युद्धाचा प्रसंग उद्बवला की तेथील भारतीय परत देशात परतू लागलात. कोरोनाच्या काळात केरळमध्ये परतणाऱ्या अशा भारतीयांच्या बातम्या सतत येत होत्या. आता युक्रेनमध्ये युध्द सुरु झाल्यावर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना परत कसे आणायचे याची चर्चा सुरु आहे.
यामुळेच या लेखाच्या पहिल्या भागात आपण भारतीय विद्यार्थी जगात कुठे कुठे आहेत याचा आढावा घेणार आहोत.
भारतीयांनी जगभरात शिक्षणासाठी जाण्याची जुनी परंपरा आहे. पण नव्या आधुनिक जगात परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सतत वाढते आहे. जगातील ८५ देशांमध्ये भारतीय विद्यार्थी शिकतात. १९९९ मध्ये परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५५,४३६ इतकी होती, तर या काळात आपल्या देशाबाहेर जाऊन शिकणारे सर्वात जास्त विद्यार्थी चीनचे होते.
२००६ मध्ये परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १,४५,५३९ इतकी झाली. आता जगभरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चीननंतर भारताचा नंबर लागू लागला. २०१३ मध्ये परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १,८१,८७२ वर पोचली. आज २०२२ मध्ये जगभरात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १० लाखावर पोचली आहे. यापैकी जवळपास ५० टक्के विद्यार्थी अमेरिका आणि कॅनडामध्ये शिक्षण घेत आहेत.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात बरेच विद्यार्थी पुन्हा भारतात परतले. परंतू कोरोना संपताच पु्न्हा हे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाऊ लागले आहेत. आता कोणत्या देशात किती भारतीय विद्यार्थी आहेत, ते पाहू.
कॅनडामध्ये २०१९ मधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २,१९,००० होती. कॅनडामधील एकुण परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी भारतीय होते. अमेरिकेतही परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीननंतर भारताचा नंबर लागतो. तिथे २०१७ मध्ये १,८६,००० भारतीय विद्यार्थी होते.
यानंतर नंबर लागतो तो संयुक्त अरब अमिरातीचा. येथील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २,१९,००० इतकी आहे. येथे असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या खुप मोठी आहे. पुर्वी भारतातील श्रीमंत लोक आपली मुले शिक्षणासाठी महाबळेश्वरच्या बोर्डींग स्कुलला पाठवत असत. आता आपल्या मुलांना दुबईच्या म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमधील बोर्डींग स्कुलमध्ये पाठविण्याची क्रेझ आहे.
यानंतर ऑस्ट्रेलियात ७७,०००, सौदी अरेबिया ८०,८००, ओमानमध्ये ४३,६००, न्युझिलंडमध्ये २९,०००, जर्मनीमध्ये २५,१४९, चीनमध्ये २३,०००, इंग्लडमध्ये ३०,५५०, रशियामध्ये १६,५००, फिलिपाईन्समध्ये १५००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
याखेरीज बहारिन, कझाकिस्तान, युक्रेन, फ्रान्स, बांगलादेश, स्पेन, सिंगापूर, नेदरलॅंड, इटली, ताजिकीस्तान, जपान या देशात मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
ऐवढ्या प्रमाणावर परदेशात शिक्षण घेतलेले हे विद्यार्थी अर्थातच जगभरात नोकरी किंवा व्यवसाय करू शकतात. त्यामुळेच जगभरातील विविध देशात असणाऱ्या भारतीयांची संख्याही खुप मोठी आहे. जगात चीनी लोकानंतर परदेशात असणारे सर्वाधिक लोक हे भारतीय आहेत.
याची माहिती आपण दुसऱ्या लेखात घेणार आहोत.