दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या वीज जोड तोडण्याची मोहीम तातडीने थांबवावी, या मागणीसाठी बामसेफ प्रणीत राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने दौंड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्यावर वीज तोड मोहीम राबवुन अन्याय सुरू केला आहे. बळीराजाला वामनासारखं पुन्हा एकदा पातळात गाडण्याचा प्रयत्न महावितरण कंपनीच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार करीत आहे. महावितरण कंपनीने कृषी पंपाच्या थकीत वीज बिल वसुली जरुर करावी, मात्र रोहीत्रे काढून वीज जोड तोडण्यापुर्वी शेतकऱ्यांना पुर्वसुचना किंवा नोटीस दिली गेली नाही. सरसकट वीज बिल तोडुन नियमित वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
महावितरण कंपनीने अन्यायकारक आणि बेकायदेशीर वीज तोड मोहीम त्वरीत थांबवावी या मागण्यासाठी शुक्रवारी ( दि.२५ ) राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी,भारत मुक्ती मोर्चा आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दौंड महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे धरले . राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र भागवत,
बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड तालुकाध्यक्ष गोरख फुलारी, राष्ट्रीय पिछडावर्ग मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय जगताप, भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा महासचिव निलेश बनकर, गिरीमचे सरपंच नंदकुमार खताळ,अजित भोंगळे, किसन मदने, किसन जाधव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनीला देण्यात आले. महावितरण कंपनीने तोडलेली रोहीत्रे पुन्हा बसवुन वीज पुरवठा चालू करावा. महावितरण कंपनीने बळीराजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, वीज जोड न केल्यास शेतकऱ्यांच्या उद्रेकास महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले, असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र भागवत यांनी यावेळी दिला.