महान्यूज लाईव्ह विशेष
महाविकास आघाडी सरकारला दररोज टीकेचे बाण सोडून घायाळ करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याने आता ठाकरे सरकारही किरीट सोमय्यांवर पलटवार करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता दिसते आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप करून किरीट सोमय्या दररोज काही ना काही टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्याचवेळी महाविकास आघाडी सरकार यावर पुढची कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत सरकारकडून पुढील कोणत्याही कारवाईची काही चर्चा झालेली नसली, तरी नील सोमय्या यांनी मात्र अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्यातील पैसा नील यांनी एका प्रकल्पात गुंतविला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणाची कागदपत्रे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवली होती. या प्रकरणात पुढील चौकशी सुरु झाल्यावर नील सोमय्या यांना अटकही होऊ शकली असती.
तत्पूर्वीच नील यांनी केलेल्या या अर्जावर आजच प्राथमिक सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन देणार का हे आजच कळणार आहे.