किशोर भोईटे
सणसर : महान्यूज लाईव्ह
सणसरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी गावातील युवकांनी एकत्र येत शाळेचा कायापालट केला. शिक्षकांनीही आपले तन,मन,धन अर्पण केले आणी ही शाळा नावारूपाला आणली. या शाळेचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा म्हणून राज्यातील आदर्श शाळेत ( मॉडेल स्कूल ) गणना करत या शाळेसाठी शिक्षण विभागाने 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या शाळेच्या नावावर अनेक पुरस्कार नोंद झाले. आता मात्र त्याहीपुढे जात सणसरची प्राथमिक शाळा राज्यातील आदर्श शाळा (मॉडेल स्कूल ) मध्ये गणली जाणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच झाला आहे.
२०१७ साली गावातील बोटावर मोजण्याइतपत तरुणांनी एकत्र येऊन या शाळेच्या डागडुजीसाठी व परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान करत सुरुवात केली. या निवडक तरुणांनी श्रमदानाची संकल्पना मांडली या संकल्पनेला गावातील ग्रामस्थ, तरुण वर्गाने भरघोस प्रतिसाद देत लोकवर्गणी उभा करून अल्पावधीतच शाळेचे चित्र पालटले.
या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनीही मागे न राहता ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना पूर्णवेळ मुलांच्या शिक्षणासाठी घालवण्याचे ठरवले. शाळेत येणाऱ्या नवीन पिढीचे स्वागत करताना भविष्यातील उज्वल पिढी घडवण्यासाठी या शिक्षकांनी कंबर कसली. शासनानेही मॉडेल स्कूलच्या धर्तीवर राज्यात काही निवडक आदर्श शाळा उभा करण्याचे ठरवले त्यामध्ये सणसरची मराठी शाळा पात्र झाली. या माध्यमातून राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली सणसर च्या प्राथमिक शाळेस 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ॲड रणजीत निंबाळकर, सरपंच, ग्रामपंचायत सणसर – गावातील युवकांनी ही शाळा नव्या रूपाने उभी करण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्याची पावती म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने वीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे. ही शाळा भविष्यातही गावचे नावलौकिक वाढवेल यात शंका नाही. शिक्षकांच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाले आहे.
पद्मजा खताळ, मुख्याध्यापिका, प्राथमिक शाळा सणसर – ग्रामस्थांनी कामकाजात शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. शिक्षकही आपले काम चोख बजावत आहेत. आमच्या शाळेतील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडविण्यावर आमचा जोर आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच आम्ही ज्ञानदानाचे पवित्र कार्य उत्तम करू शकलो ही शाळा राज्यात आदर्श तर झालीच परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा करण्यावर आमच्या सर्व शिक्षकांचा भर आहे.